Ganesh Visarjan 2024 : लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप! बुलडाणा,भिवंडीत विसर्जनावेळी तणाव
Ganesh Visarjan 2024 : गगणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात मंगळवारी लाडक्या गणपती बाप्पाला राज्यात भावपूर्ण निरोप देण्यात आला. मुंबई, पुण्यासह राज्यभरात भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप दिला गेला. पण यादरम्यान बुलढाणा आणि भिवंडीमध्ये गणरायाला निरोप देताना तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. जळगाव जामोद येथे विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटात वाद तर भिवंडीत गणेश विसर्जन मिरवणुकीत दगडफेक झाली.
भिवंडी आणि बुलडाणा वगळता राज्यात सर्व विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या आहेत. ढोल-ताशाच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. गणपती बप्पा मोरयाच्या गजरात सर्वांनी लाडक्या बप्पांचं पूजन करुन शांततेत विसर्जन केलं. धुळे जिल्ह्यात अन् किरकोळ अपवाद वगळता राज्यात कुठेही मोठी प्राणहाणी झाली नाही.

बुलडाण्यात तणाव
मंगळवारी सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातीत जळगाव जामोद येथे विसर्जन मिरवणुकी दरम्यान दोन गटात वाद झाला होता. त्यानंतर आलेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झालं आहे. तीन पोलीस कर्मचायांसह अनेक गणेशभक्त जखमी झाले. त्यानंतर जळगाव जामोद शहरातील पंधरा गणेश मंडळांनी दोषीवर कारवाई केल्याशिवाय विसर्जन करणार नाही अशी भूमिका घेतली होती. जळगाव जामोद शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.एसआरपीची तुकडीही तैणात करण्यात आली होती.
भिवंडीत विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक
भिवंडीतील बंजारपट्टी नाका येथे काही काळ परिसरात तणाव संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव शांततेत पार पडत असताना मंगळवारी विसर्जन दुपारी तीन वाजता पासून भिवडी शहरात शांततेत सुरू झाली होती. त्यानंतर रात्री साडेबारा वाजता बंजारपट्टी नाका परिसरात श्री हनुमान मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर अज्ञाताने दगडफेक केली. यानंतर संपूर्ण परिसरात मोठ्याप्रमाणात तणाव निर्माण झाली होती, गणेश भक्ताने रस्त्यात बसून घोषणाबाजी केली. यावेळी काही जणांना जमावाकडून मारहाण झाल्याचे वृत्त आहे.
सौम्य लाठीमार, जमाव पांगवला
हा प्रकार सुरु असताना वाढता तणाव पाहता पोलिसांनी बळाचा वापर केला आणि सोम्य लाठीमार करुन जमावाला पांगवले. यात काही लोक किरकोळ जखमी झाले. जमावाकडून झालेल्या दगडफेकीत एक पोलिस जखमी झाला आहे. या घटने नंतर शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्णाात आला असून पोलिसांनी काही संशयिताना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले.
मुंबईत 7500 गणेशमूर्तींचे विसर्जन
मुंबई शहरात अनेक ठिकाणी गणेश विसर्जन उत्साहात पार पडले. बीएमसीने एका निवेदनात म्हटले आहे की बाईमध्ये 7500 हून अधिक गणेश-गौरी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही.
बीएमसीने सांगितले की, "शहरातील समुद्र, तलाव आणि कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित केलेल्या मूर्तींपैकी 7,227 घरगुती गणपती, 300 सार्वजनिक मंडळे आणि सुमारे 50 देवी गौरीच्या मूर्ती होत्या, त्यापैकी 2,880 मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आल्या. मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशमूर्ती 'लालबागचा राजा'ची विसर्जन मिरवणूक सायंकाळी साडेसहा वाजता गिरगाव चौपाटी किंवा समुद्रकिनारी पोहोचल्याने विसर्जन मिरवणुकीमुळे अनेक मार्गावरील बसचे मार्ग बदलले आहेत.
नाशिकमध्ये दोन लाखाहून अधिक विसर्जित मूर्तींचे दान
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत आज नाशिक शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी गणरायाला निरोप देण्यात आला. आज दुपारी नाशिक शहरातील वाकडी बारव येथील नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ केला यावेळी आमदार देवयानी फरांदे यांच्यासह अंत्य राजकीय नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या निवडणुकीत अनेक मंडळांच्या मिरवणुकीत आदिवासी कलापथके, मर्दानी खेळ तसेच गुलालवाडीचे लेझीम पथक आकर्षण ठरले. नाशिक महापालिकेचा मानाचा गणपती मिरवणुकीच्या अग्रभागी होता.
नांदेडमध्ये श्री विसर्जन शांततेत...
नांदेड जिल्ह्यात मंगळवारी श्री विसर्जन शांततेत आणि उत्साहात पार पडले लाडक्या गणरायाला निरोप देताना लवकर येण्याचा आग्रहही भक्तांनी केला. नांदेड जिल्ह्यात 25 हजार सार्वजनिक गणेश मंडळ तसेच घरगुती गणपतीचे मंगळवारी सकाळी अकरा वाजेपासून विसर्जन सुरू झाले. नांदेड शहरात 26 ठिकाणी महापालिकेच्या वतीने श्री गणेश मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात आले होते.
निर्माल्य संकलनासाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन हे नांदेड शहराजवळील झरी तलावात करण्यात आले. तसेच पासदगाव, आसना, नावघाट येथेही कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती. विसर्जन कालावधीत शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलीस दलाच्या वतीने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री अकरा वाजेपर्यंत बहुतांश गणेश मंडळाच विसर्जन पार पडले होते. विसर्जन मिरवणुकात डीजे, लेझर बिमवर बंदी असल्याने मिरवणुकांमध्ये ढोल ताशांचा वापर करण्यात आला. शहरात ठीकठिकाणी विविध संस्था, गणेश मंडळांच्या वतीने अन्नदानही करण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्यात गणरायाला मोठ्या भक्ती भावाने निरोप
अहमदनगर जिल्ह्यात गणरायाला मोठ्या भक्ती भावाने निरोप देण्यात आला. ताल वाद्य पथके, डिजे च्या आवाजात बाप्पाला निरोप देण्यात आला. शहरातील ताल योगी पथक गेल्या अनेक वर्षापासून घराघरातील गणपती गोळा करत विसर्जन करतात. यंदाही मोठ्या गाडीत घरोघरी स्थापित केलेले गणपती मांडण्यात आले होते. शहरात दोन ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. महिलांचा मोठा उत्साह ढोल पथकात पहावयास मिळत होता.












Click it and Unblock the Notifications