Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ganesh chaturthi 2024 : एकदा तरी घ्यावे दर्शन; अशी आहेत विदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण अष्टविनायक मंदिरे

Ganesh Festival 2024 : गणपती किंवा गणेश ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय देवता आहे. भारतासोबत जगभरातील अनेक देशांत 10 दिवस चालणारा हा गणेशोत्सवाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते, आणि अनंत चतुर्दशीदिवशी गणपती विसर्जन होते. महाराष्ट्रात जशी प्रसिद्ध अष्टविनायक मंदिरे आहेत तशीच महाराष्ट्राच्या पूर्वेकडे असलेला निसर्गसंपन्न प्रदेश म्हणजे विदर्भात देखील आहेत. विदर्भातले अष्टविनायकसुद्धा खास बघण्याजोगे आहेत. त्यांच्याशीसुद्धा विविध कथा, दंतकथा जोडल्या गेलेल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया विदर्भातील अष्टविनायकांविषयी.

वरदविनायक- टेकडी गणपती नागपूर

विदर्भातील अष्टविनायकातील पहिला समजला जाणारा गणपती म्हणजे नागपूरचा टेकडी गणपती. ऐन नागपूरमध्ये असलेले हे प्रसिद्ध देवस्थान. पिंपळाच्या झाडाखाली गणेशाची शेंदूराचीच प्रतिमा पाहायला मिळते. नागपूर हे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे गाव. प्राचीन काळापासून अगदी पुरातत्त्वीय संदर्भ आणि पुरावे नागपूरसंदर्भात उपलब्ध आहेत. ऐतिहासिक भोसले-इंग्रज लढाई ज्या सीताबर्डी परिसरात झाली तिथेच हे गणपतीचे मंदिर आज उभे आहे. स्वयंभू गणेशाची ही मूर्ती एका प्राचीन मंदिराच्या भग्न झालेल्या अवशेषांमध्ये मिळाली असे सांगितले जाते.

Ashtavinayak Ganpati

सिद्धिविनायक एकचक्रा

नागपूर-वर्धा रस्त्यावर वध्र्यापासून अंदाजे 25 कि.मी. अंतरावर केळझर किल्ल्यावर हे प्राचीन गणेशाचे देवालय वसले आहे. पांडवांनी बकासुर वधाची स्मृती म्हणून या गणपतीची स्थापना केली, अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. प्राचीन काळी केळझर या गावालाच एकचक्रानगरी म्हणून ओळखले जायचे. अर्थातच या गणेशालासुद्धा एकचक्रागणेश असे म्हणतात. केळझरच्या किल्ल्यावर उंच जागेवर हे गणेश मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला चौकोनी पुष्कर्णी असून दगडांनी भक्कम बांधलेली आहे. विहिरीतील पाण्यापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधून काढल्या आहेत. रस्त्याच्या दक्षिणेकडे एक तलाव आहे. या तलावात बाहुबलीची काळ्या दगडाची एक मूर्ती सापडली होती. गणेश मंदिरातील गणेशमूर्ती उजव्या सोंडेची असल्यामुळे याला सिद्धिविनायक असे म्हणतात.

शमी विघ्नेश -आदासा

शमी विघ्नेशाचे क्षेत्र वामनवरद वक्रतुंड क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे गणेशाच्या 21 स्थानांपकी हे एक जागृत गणेश स्थान आहे. संकष्ट आणि शत्रू या तीन दानवांनी जगाला त्रासून सोडले होते.या दानवांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी सर्व देवांनी शंकर-पार्वतीरूपी शमीच्या वृक्षाखाली गणपतीची आराधना केली.तेव्हा त्या वृक्षाच्या मुळापासून शमी विघ्नेश प्रकट झाला आणि त्याने त्या तीनही दानवांचा संहार केला. ज्या स्थळी ही कथा घडली त्या ठिकाणी मुदगल ऋषींनी गणेशमूर्तीची स्थान केली. तेच हे अदोष क्षेत्र. तसेच वालीच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी विष्णूने वामनावतार घेतला होता.या कार्यात आपल्याला शक्ती प्राप्त व्हावी म्हणून त्याने शमी विघ्नेशाची आराधना केली व त्याच्या कृपेने बळीच्या यज्ञाचा विध्वंस केला.या प्रसंगानंतर वामनाने वक्रतुंड नावाने गणेशाची मूर्ती स्थापन केली. अशी दुसरी कथाही या गणपती बाबत सांगितली जाते.

सर्वतोभद्र गणपती - पौनी

विदर्भातील अष्टविनायकांपकी एक आगळावेगळा गणपती वैनगंगेच्या तीरावर वसलेल्या पौनी गावात हा गणपती आहे इथे गणपतीची मूर्ती नसून त्याऐवजी मंदिरात एक उभा पाषाण आहे आणि त्याला पाच बाजूंनी पाच तोंडे आहेत. त्यामुळे याला सर्वतोभद्र गणपती, भद्रा गणपती, पंचानन, विघ्नराज अशा विविध नावांनी संबोधले जाते. मूर्तीच्या सर्व बाजूंनी गणपतीची तोंडे असल्यामुळे कोणत्याही बाजूने याचे दर्शन घेता येते. सर्व दिशांनी किंवा सर्व बाजूंनी ज्याचे दर्शन घेता येते तो सर्वतोभद्र किंवा अशा मूर्तीला सर्वतोभद्र मूर्ती असे म्हटले जाते.

चिंतामणी गणेश -कळंब

नागपूर-यवतमाळ मार्गावरील कळंब गावी प्रसिद्ध एकवीस गणपती क्षेत्रांपकी एक पीठ असलेले प्राचीन कदंबपूर म्हणजेच आजचे कळंब होय. इथले गणपती मंदिर काहीसे वेगळे आहे, अंदाजे १५ फूट जमिनीखाली ही मूर्ती प्रस्थापित केलेली आहे. त्यासाठी तीन जिने उतरून आपल्याला तिथे जावे लागते. जवळच एक चौकोनी पावनकुंड असून त्याचे पाणी औषधी असल्याचे सांगतात. कोणतेही त्वचारोग त्या पाण्याने दूर होतात, असे इथे सांगितले जाते. या ठिकाणी जमिनीखाली पाण्याचे प्रवाह आहेत. त्या पाण्याची पातळी वाढायला लागून या गाभाऱ्यात पाणी साठू लागते आणि गणेशमूर्तीच्या पायाला पाणी लागले की पुन्हा ते ओसरते, असे बारा वर्षांतून एकदा घडते.

भृशुंड गणपती - मेंढा भंडारा

भंडा-यातील मेंढा या गावी वैनगंगा नदीच्या तीरावर विदर्भातील अष्टविनायकांपकी हा प्राचीन स्थंडिलग्राम नावाने प्रसिद्ध असलेल्या गणपती वसलेला आहे.या गणपतीबद्दल एक कथा सांगितली जाते. नामा कोळी लोकांना त्रास देत असे, वाटमा-या करीत असे. एकदा तो गणेशतीर्थ या ठिकाणी अंघोळीला गेला असता मुद्गल ऋषी तिथून चालले होते. ते तोंडाने गजानन गजानन असे नामस्मरण करीत होते. नामा कोळ्याने त्यांना मारण्यासाठी आपली तलवार उपसली आणि तो आता वार करणार एवढय़ात ती तलवार गळून जमिनीवर पडली. नामा कोळ्याला पश्चात्ताप झाला आणि आपली पापे धुण्यासाठी काय करावे याची याचना त्याने मुदगल ऋषींकडे केली.

मुदगल ऋषींनी त्याला सांगितले की ते परत येईपर्यंत नामा कोळ्याने श्री गणेशाय नम: असा जप सुरू करावा. तसेच त्यांनी एक वाळकी काठी दिली आणि तिला रोज पाणी घालायला सांगितले. जेव्हा त्या काठीला पालवी फुटेल तेव्हा मी परत येईन, असे आश्वासन मुद्गल ऋषींनी दिले. अनेक वष्रे अशीच गेली आणि मुदगल ऋषी तिथे परत आले. त्यांना त्या काठीच्या जागी एक भलामोठा वृक्ष आणि एक मुंग्यांचे वारूळ दृष्टीस पडले. वारुळातून श्री गणेशाय नम: असा आवाज येत होता. ऋषींनी ते वारूळ बाजूला करून पाहिले तर त्यांना नामा कोळी नामस्मरण करताना आढळला. तो गणेशसाधनेत इतका गणेशमय होऊन गेला होता की त्याला नाकाच्या ठिकाणी गणपतीप्रमाणे सोंड फुटली होती.

मुदगल ऋषींनी त्याचे तप आणि त्याची सोंड पाहून त्याचे नामकरण भृशुंड ऋषी असे केले. या भृशुंड ऋषींनीच इथे गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. मुदगल ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला की आणि जो कोणी या ठिकाणी दर्शनाला येईल त्याला सर्व शक्ती प्राप्त होतील असे सांगितले.

अठरा हातांचा गणपती-रामटेक

रामटेक मध्ये पापधुपेश्वर तीर्थाकडे जाताना वाटेत गवळीपुरा इथे हे मंदिर वसले आहे. अठरा हातांची गणपतीची मूर्ती काहीशी दुर्मीळच आहे, अंदाजे पाच फूट उंचीची, पद्मासनात बसलेल्या गणपतीची ही देखणी मूर्ती अठरा हातांची आहे. देवाच्या अठरा हातात पाश, अंकुश, खट्वांग, त्रिशूल अशी विविध आयुधे दाखवली आहेत. पकी एका हातात मोदक आणि दुसऱ्या हातात मोरपंखाची लेखणी दिसते. अठरा विज्ञानाचे ज्ञान असलेला हा गणपती असल्यामुळे याला अठरा हात दाखवले आहेत, असे स्थानिक सांगतात. तर अठरा सिद्धींमुळे या गणपतीचे पूजन विघ्नेश्वर म्हणून करतात, असे पुराणात सांगितले आहे. उजव्या सोंडेचा गणपती असल्यामुळे याला सिद्धिविनायक असेही म्हटले जाते.

वरदविनायक गौराळा-भद्रावती

भद्रावतीत असलेल्या या गणपती मंदिराला 16 खांब असलेला भव्य सभामंडप आहे. गणपती मंदिर आणि मूर्ती दोन्ही उत्तराभिमुख आहेत. मुख्य गाभारा काहीसा खालच्या पातळीत असल्यामुळे काही पायऱ्या उतरून प्रवेश करावा लागतो. आत अंदाजे आठ फूट उंचीची गणेशाची बसलेल्या स्थितीतली मूर्ती आहे. उजवा पाय मुडपून जमिनीवर आहे तर डावा पाय दुमडून शेजारी उभ्या स्थितीत दिसतो. देवाला दोनच हात असून दोनही हातात मोदकपात्र दिसते. गणपतीच्या मस्तकाभोवती प्रभामंडळ कोरले असून त्यावर मुकुट कोरलेला दिसतो. येथे गणेशभक्तांची नेहमी गर्दी असते.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+