Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुलाचा मृत्यूमुळे व्यथित पित्याने केली होती प्रतिष्ठापणा; असा आहे दगडूशेठ गणपतीचा इतिहास

Dagdusheth Ganpati : गणपती किंवा गणेश ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय देवता आहे. भारतासोबत जगभरातील अनेक देशांत 10 दिवस चालणारा हा गणेशोत्सवाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते, आणि अनंत चतुर्दशीदिवशी गणपती विसर्जन होते.

महाराष्ट्रात अष्टविनायक मंदिरे असून याव्यतिरिक्त अनेक प्रसिद्ध गणपतीची मंदिरे आहेत आम्ही या मालिकेत तुम्हाला राज्यातील प्रसिद्ध गणपती मंदिरांबाबत माहिती देत आहोत आज आम्ही तु्म्हाला पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीविषयी माहिती देत आहोत. नवसाला पावणारा गणपती म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास, त्याचे महत्व काय आहे याबद्दल माहिती असणे तुम्हाला आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया.

dagdusheth halwai ganpati pune

श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा इतिहास

श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे इंग्रजांच्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. पुण्यातील बुधवार पेठेतील सध्याचे दत्त मंदिर म्हणजेच त्यांची राहायची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये प्लेगची साथ आली अन् या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्या घटनेने दगडूशेठ व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई हे दोघेही दु:खसागरात बुडाले

दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन करत त्यांना धीर देत सांगितले की, एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले आपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्‍ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्‍ज्वल करतील.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई

माधवनाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ यांनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली. त्यावेळी परिसरातील बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यांसह अनेक लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्यनियमाने पूजा चालू होती.

लोकमान्य टिळकांकडून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात

1894 साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या मूर्तीला देवत्व प्राप्त होण्याचे भाग्य दगडूशेठ गणपतीला लाभले आहे. या मंडळाची स्थापना 1893मध्ये झाली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती 1896 साली तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. पंरतू दगडूशेठ यांनी स्थापन केलेल्या गणेशमुर्तीचा गणेशोत्सव सुरुच राहिला, या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करत होते. त्याकाळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता.

1968 मध्ये तयार झाली मंडळाची मूर्ती

मंडळाची नवीन मूर्ती 1968 साली बसविण्यात आली. प्रसिद्ध शिल्पकार, मूर्तिकार आणि यंत्रविज्ञेचे अभ्यासक शंकरअप्पा शिल्पी यांच्या यांनी ही मूर्ती घडवली आहे. ही मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असताना त्यावेळी सूर्यग्रहण आले होते. त्या ग्रहणातील एका विशिष्ट वेळेत मूर्तीमध्ये गणेशयंत्र बसविले तर त्या मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढत जाईल आणि या मूर्तीला देवत्व प्राप्त होईल अशी शिल्पी यांची श्रद्धा होती. त्यांच्या श्रद्धेचा मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही आदर केला आणि धार्मिक पद्धतीने विधी करूनच ही मूर्ती घडविण्यात आली.

अशी आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्तीच्या चेह-यावर वर शांत, प्रसन्न आणि पाहताच पावले थबकून राहावीत असे भाव चेहऱ्यावर आहेत. बैठ्या मूर्तीचे चारही हात सुट्टे असून डाव्या हातामध्ये मोदक आहे, तर उजवा हात वरद म्हणजे आशीर्वाद देणारा आहे. अन्य दोन हातांमध्ये कमळ आणि डोक्यावर मुकूट आहे. मूर्तीच्या सोंडेवरील नक्षीकाम हाही उत्कृष्ट कलाकारीचा नमुना आहे. मूर्तीच्या डोळ्यांमध्येच मूर्तीची प्रसन्नता, सात्त्विकता आणि उदात्तता दिसून येते. कोठूनही पाहिले तरी गणपती आपल्याकडेच पाहात आहे याची प्रचिती दर्शन घेणाऱ्या भाविकाला येते हे या मूर्तीचे खास वैशिष्ट्य.

जया बच्चन यांनी केला होता नवस

'कुली' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना जीवघेणा अपघात झाला होता. त्यावेळी जया बच्चन यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन नवस केला होता. सुखरूप बरे झाल्यानंतर अमिताभ आणि जया बच्चन या दांपत्याने सोन्याचे कान अर्पण केले होते. पूर्वीचे मंदिर अपुरे पडू लागल्यानंतर 2002 मध्ये सध्याचे भव्य मंदिर उभारण्यात आले.

देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे गणपती

गणेशोत्सवादरम्यान ट्रस्टतर्फे दरवर्षी सादर केला जाणारा देखावा आणि त्याची विद्युत रोषणाई हा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रिबदू असतो. भारतातल्या प्राचीन मंदिराचे देखावे उभारणं हे या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. ज्या लोकांना दूरवरच्या तीर्थक्षेत्राला जाणं होत नाही त्या लोकांना ती मंदिर बघायला मिळावीत हा मंडळाचा उद्देश असतो.

विविध सामाजिक उपक्रम

गणेशोत्सव हा केवळ आपल्या मंडळापुरताच राहू नये या भूमिकेतून उत्सवाला विधायक वळण प्राप्त करून देण्यासाठी ट्रस्टने राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा सुरू केली. गणेशोत्सवामध्ये ऋषिपंचमीला हजारो महिलांचा सहभाग असलेला अथर्वशीर्ष उपक्रम केला जातो, जो जगप्रसिद्ध आहे.

गेल्या 40 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. ट्रस्टतर्फे कोंढव्यामध्ये देवदासी आणि अनौरस मुलांचा सांभाळ करून त्यांना योग्य शिक्षण देणारे बालसंगोपन केंद्र आणि पिताश्री वृद्धाश्रम चालवले जाते. अनेक गावांमध्ये जलसंधारणाची कामे यशस्वी केलेल्या ट्रस्टतर्फे ससून रुग्णालयातील रुग्णांना उत्तम भोजनसेवा दिली जात आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी देखील अनेक उपक्रम ट्रस्टतर्फे राबविण्यात येतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+