माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मेहूण्यासह 5 जणांवर गु्न्हा दाखल, काय आहे प्रकरण घ्या जाणून
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या मेहुण्यासह पाच जणांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग येथे शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण व दमदाटी करून शेतातील झोपडी पाडल्याबद्दल धनंजय मुंडे यांचे मेहुणे व युवा राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब ओमासे यांच्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेडग येथे दीड एकर जमिनीच्या मालकीबाबत राहुल ओमासे व जितेंद्र ओमासे यांच्यात वाद आहे. हे प्रकरण न्यायालयातही सुरू आहे. याबाबत न्यायालयाकडून आदेश मिळाल्याचा दावा करीत ता. 22 रोजी दुपारी दोन वाजता जितेंद्र ओमासे व जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब ओमासे, रघु नागरगोजे, नेताजी ओमासे, मल्हारी खाडे, स्वप्निल साबळे हे सर्वजण वाद सुरू असलेल्या शेतात गेले. त्याठिकाणी राहुल ओमासे यांच्या झोपडीत घुसून त्यांना घराबाहेर काढून त्यांची झोपडी पाडून नुकसान केले.

यावेळी राहुल ओमासे यांचे वडील सुरेश यांना मारहाण करून राहुल व त्यांच्या आईस शिवीगाळ केल्याची तक्रार आहे. याबाबत राहुल सुरेश ओमासे (रा. बेडग, ता. मिरज) यांनी फिर्याद दिली असून मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब ओमासे, रघू नागरगोजे, नेताजी ओमासे, मल्हारी खाडे, स्वप्निल साबळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान दोन दिवसांपुर्वीच धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचा पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात आकस्मिक निधन झाले होते. त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्टिट करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. अंजली दमानिया यांनी एक ट्टिट करुन हा मृत्यू आकस्मिक आणि संशयास्पद असल्याचा दावा केला होता. त्यांनी सोशल मीडियावरून या प्रकरणात धनंजय मुंडे आणि त्यांच्या कंपन्यांशी संबंधित राजेंद्र घनवट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अंजली दमानिया यांनी या मृत्यूवर संशय व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले की, खूप खूप धक्कादायक ! राज घनवट, जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीच्या आकस्मित मृत्यू झाला आहे. कारण स्पष्ट नाही. पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. राज घनवट धनंजय मुंडे त्यांच्या कंपन्यात डायरेक्टर आहेत, ह्याच राज घनवट ने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत, व याच जमिनीच्या चौकशीची मागणी, मी महसूल मंत्री बावणकुळे यांच्याकडे केली होती.
ही आत्महत्या आहे,असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, असं त्यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.












Click it and Unblock the Notifications