Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विधानभवन की कुस्तीचे मैदान; आव्हाड-पडळकर समर्थकांत तुंबळ हाणामारी, Video व्हायरल!

Maharashtra Vidhan Bhavan fight Video goes viral : विधानभवनाच्या लॉबीत आज सायंकाळी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये थेट विधिमंडळाच्या आवारातच जोरदार हाणामारी झाली.

या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे लॉबीमध्ये उपस्थित असलेले आमदार आणि पत्रकारही भेदरून सुरक्षित ठिकाणी धावले. या घटनेने विधानभवनातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, विधानसभा अध्यक्षांनी याची गंभीर दखल घेतली आहे.

Maharashtra Vidhan Bhavan Video goes viral

वादाची ठिणगी आणि आजचा थरार

या वादाची सुरुवात मागील आठवड्यात झाली होती, जेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळ परिसरात गोपीचंद पडळकर यांना पाहून 'मंगळसूत्र चोर' अशी घोषणाबाजी केली होती. यावर पडळकर संतापले होते. 5 दिवस उलटत नाहीत तोच, बुधवारी विधानभवनाच्या गेटवर या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.

त्यानंतर आज पडळकरांच्या एका समर्थकाने आव्हाड यांना मारण्याची धमकी दिली होती. या धमक्यांचे पडसाद आज विधानभवनाच्या लॉबीत उमटले, जिथे दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यांच्यात अक्षरशः कपडे फाटेपर्यंत जोरदार हाणामारी झाली. या घटनेत आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाल्याची माहिती आहे.

गोपीचंद पडळकरांचे मौन आणि आव्हाडांचा संताप

या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांना विचारले असता, त्यांनी आपला या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, जितेंद्र आव्हाड यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला आपण ओळखत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "मी भाषण करून थोडी मोकळी हवा घेण्यासाठी सभागृहाबाहेर आलो होतो, तेव्हा हा प्रकार घडला. हे लोक मलाच मारण्यासाठी आले होते. हा हल्ला कुणी केला हे संपूर्ण महाराष्ट्राला समजले आहे. याहून मोठा पुरावा काय पाहिजे? तुम्ही विधानभवनात गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील, तर आमचेच जीव सुरक्षित नाहीत."

आव्हाड यांनी पुढे म्हटले की, "मला आई-बहिणीवरून शिवीगाळ करण्यात आली आहे. मारून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. कुत्रा, डुक्कर अजून बरेच काही लिहिले आहे. काय चालू आहे विधानसभेत? विधानसभेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार सुरक्षित नसतील, तर कशाला राहायचे आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कुणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई-बहिणींवर शिव्या देतो. त्याला ऑफिशिअल लँग्वेज म्हणून घोषित करा. असंसदीय शब्द वापरले जातात. त्यालाच आता संसदीय शब्द म्हणून घोषित करा. सत्तेचा एवढा माज!"

उद्धव ठाकरे यांची कडक मागणी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "हाणामारी करणारे समर्थक होते का गुंड होते? येथे अशी परिस्थिती निर्माण झाली असेल, तर विधानभवनाला अर्थ काय? ज्यांनी या लोकांना पास दिले, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचे नाव पुढे आले पाहिजे. शेवटी हा अधिकार अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांची दिशाभूल केली गेली का? हा पण विषय आहे. पण अशी मारामारी, आमदारांना धक्काबुक्की, ही गुंडगिरी आता विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी सर्व विषय सोडून या गुंडांवर व त्यांच्या पोशिंद्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. असे झाले तरच तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवण्याच्या पात्रतेचे आहात असे मी म्हणेन."

ठाकरे यांनी पुढे म्हटले, "झालेला प्रकार अतिशय गंभीर आहे. विधानभवनासारख्या वास्तूचे पावित्र्य जपले पाहिजे. त्यांचे वाद वैयक्तिक असतील, तर ते बाहेर झाले पाहिजे. पण विधानभवनात गुंड आणणाऱ्यांची चौकशी व्हायला हवी. ज्यांनी पास दिली त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी."

सभागृहात तीव्र चिंता, सरकारकडून चौकशीचे आश्वासन

विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमधील आमदारांनी या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आमदार रोहित पवार यांनी या घटनेची माहिती सभागृहाला देत कठोर कारवाईची मागणी केली.

राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक यांनी विधानसभेत बोलताना आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या घटनेचे वर्णन केले. त्या म्हणाल्या, "एक महिला म्हणून आम्ही जेव्हा आत येतो, तेव्हा आसपास अनेक पुरुष असतात. त्यातच अशी एखादी घटना घडली तर सर्वच पुरुष एकाच दिशेने धावतात. त्या स्थितीत आम्हा महिलांना कोण संरक्षण प्रदान करेल? आमच्यासोबत आमचा केवळ एक पीए असतो. तो लोकांना आवाज देऊन बाजूला करतो. पण आज ज्या वेगाने लोक आतमध्ये घुसत होते, ते भयंकर होते. हे पाहून मी सभागृहाला त्याची माहिती देण्यासाठी पुन्हा परत आले. सध्या विधिमंडळ परिसरात कोणतीही शिस्त दिसून येत नाही."

यावर मंत्री आशिष शेलार यांनी या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतल्याची माहिती सभागृहाला दिली. ते म्हणाले, "आज घडलेल्या सर्व घटनांची सरकारने गांभीर्याने नोंद घेतली आहे. आजची घटना विधानभवनाच्या प्रांगणात घडली आहे. सरकारला आपले काम करावेच लागेल. सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचा सदस्य असला, कुणालाही धक्काबुक्की, मारहाण किंवा इतर काही झाले असेल, तर ते गंभीरच आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट केली जाईल."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+