शेतकऱ्यांच्या बहरलेल्या आयुष्याचे स्वप्न पाहणारा नेता
मुंबई : देश स्वतंत्र झाला. पण, शेतकरी जणू अजूनही जणू गुलामीतच आहेत. पूर्वी ज्या समस्या होत्या त्या आजही कायम आहेत. महागाई वाढली आहे. शेतीचा खर्चही दुपटीने तिपटीने वाढला आहे. परंतु, शेतमालाचा भाव आहे तिथेच आहे. परिणामी, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. याच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बच्चू कडू प्रस्थापितांच्या विरोधात लढत आहेत. हा लढा अजिबात सोपा नाही. तरीही ते कधी सत्तेत असताना सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका करतात तर कधी विरोधात जातात. सत्तेत असो वा विरोधात कडू यांचे एकच ध्येय आहे ते म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यामुळेच या नेत्याचे पाय अजूनही मातीत घट्ट रोवलेले आहेत. सहजतेने कडू सगळ्यांना भेटतात. प्रत्येकाला हा नेता आपला वाटतो. तसा शेतकरी विरोधी असणाऱ्यांना भांडवलशाहीवादी व्यक्तींना तो अडसर वाटतो. हेच बच्चू कडू यांचे यश आहे.
महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांमध्ये बच्चू कडू हे एक आगळंवेगळं आणि ठळक नाव आहे. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आलेले हे नेते फक्त राजकारणापुरते सीमित न राहता, विविध आंदोलनांतून शेतकऱ्यांच्या, अपंगांच्या आणि गरिबांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत आले आहेत. बच्चू कडू यांची कार्यशैली, त्यांनी उभं केलेलं सामाजिक आंदोलन आणि सरकारी अधिकाऱ्यांशी घेतलेली उग्र भूमिका यामुळे ते महाराष्ट्रभर चर्चेत राहिले आहेत. या सर्व गोष्टींमुळे बच्चू कडूंनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बच्चू कडू नेहमी आक्रमक
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सगळेच बोलतात. पण, ते सोडविण्यासाठी कृती करीत नाहीत. याला बच्चू कडू अपवाद आहेत. अधिकारी वर्ग शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास टाळाटाळ करत असल्याच्या कारणावरून बच्चू कडू आणि त्यांचे अनेकदा अधिकाऱ्यांसोबत वाद झाले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार काहीच उपाययोजना करत नसल्याने नागपूर हिवाळी अधिवेशन काळात त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून केलेलं शोले स्टाईल आंदोलन राज्यभर गाजले. सरकारच्या वतीने तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील आणि वित्त व योजना राज्यमंत्री सुनील देशमुख यांनीही टाकीवर चढूनच त्यांच्याशी चर्चा करून 75 मागण्या मान्य केल्या होत्या. 700 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी बच्चू कडू यांनी स्वीकारली आहे.
आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन
आदिवासी बांधव परंपरेने कसत असणारी शेतजमीन त्यांच्या नावे करण्याच्या शासकीय अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याच्या कारणावरून त्यांनी आपल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांसोबत स्वतःला त्या शेतजमिनीत गळ्यापर्यंत गाडून घेण्याचे आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच आदिवासी समाजाच्या वनपट्टे मिळण्याच्या मागणीबाबत वनाधिकारी दुजाभाव करत असल्याच्या निषेधार्थ बच्चू कडूंनी त्या अधिकाऱ्याच्या घरात साप छोडो आंदोलन करण्याची घोषणा करताच दुसऱ्याच दिवशी आदिवासींना वनपट्टे मंजूर झाले.
अधिकार्यांच्या खुर्चीचा लिलाव
खेड्यापाड्यातून तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या शेतकर्यांना अधिकारी वेळेवर भेटत नसल्याने लोकांचा खोळंबा व्हायचा. बच्चुभाऊंना हा विषय समजताच त्यांनी अधिकाऱ्याच्या खुर्चीचा लिलाव आंदोलन केले. त्यातून आलेली रक्कम सरकारी खजिन्यात जमा केली. परिणामी अधिकारी कार्यालयीन वेळेत लोकांची कामे करण्यासाठी उपस्थित राहू लागले.
दुष्काळग्रस्तांसाठी गणपती आंदोलन
2004-05 च्या दुष्काळात दुष्काळग्रस्तांना शासकीय मदत मिळण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ त्यांनी तहसील कार्यालयातच गणपती स्थापन करून जोपर्यंत शासन न्याय देत नाही तोपर्यंत या गणपतीचे विसर्जन करणार नाही अशी घोषणा केली. ते गणपती आंदोलन पाहून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली.
रुमणे आंदोलन
शहरी भागात अखंड वीजपुरवठा आणि ग्रामीण भागात भारनियमन या दुजाभावाच्या निषेधार्थ बच्चू कडूंनी अमरावती वीज महामंडळाच्या कार्यालयाबाहेर रुमणं आंदोलन केले. त्यात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटपट झाली. कार्यकर्ते जखमी झाले. ऊर्जामंत्र्यांनी याची तात्काळ दखल घेऊन भारनियमन दोन तासांनी कमी करण्याचे आदेश दिले.
कापसाच्या बिलासाठी मुंडन
कापसाची बिले द्यायला शासन उशीर करत असल्याच्या निषेधार्थ बच्चू कड्डू यांनी सामूहिक मुंडन आंदोलन केले. परिणामी शेतकऱ्यांना त्वरित कापसाची बिले देण्याचे आदेश देण्यात आले होते. दारु बंद व्हावी म्हणून दारूच्या दुकानांसमोर "दूध वाटप आंदोलन" केले. बच्चुभाऊंची छप्परबंद आंदोलन, मंत्र्यांच्या वाहनांवर काळ्या रंगाचे पट्टे मारण्याचे आंदोलन, अचलपूर जिल्हानिर्मितीच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन, संडास योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या पंचायतराज समितीला सडलेले संडासच्या भांडे भेट देण्याचे आंदोलन, शाळकरी जीवनातील सुतळी बॉम्ब आंदोलन, मंत्र्याच्या घरी जाऊन त्याचे कान पकडून च्यावम्याव आंदोलन, राज्यातील मंत्र्यांचे मुखवटे लावून आंदोलन, इत्यादी विविध अभिनव आंदोलने केली आहेत.
गुजरातमध्ये जाऊन केलं आंदोलन
एप्रिल 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गाव ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावापर्यंत म्हणजेच गुजरातमधील वडनगर इथपर्यंत काढलेली "आसूड यात्रा" खूप गाजली. गुजरातच्या सीमेवर ही यात्रा अडवण्यात आल्यानंतर बच्चुभाऊंनी वेषांतर करून गुजरातमध्ये प्रवेश मिळवला. मोदींच्या वडनगर या गावी जाऊन त्यांनी रक्तदान केले आणि सरकारला संदेश दिला की या देशातील शेतकऱ्यांचे रक्त घ्या, पण त्यांचा जीव घेऊ नका.
अनोख्या आंदोलनांची परंपरा
बच्चू कडू यांचं कार्य वेगळं ठरलं ते त्यांच्या आंदोलनांमुळे. त्यांनी नेहमीच पारंपरिक पद्धतीच्या राजकीय आंदोलनांच्या पलीकडे जाऊन,अनोख्या आणि लक्षवेधी पद्धतीने आंदोलनं केली आहेत. तसेच शोले चित्रपटातील वीरूच्या स्टाईलमध्ये इमारतीवर चढून आंदोलन केलं.
शेतकरी आणि अपंगांच्या हक्कांसाठी लढा
बच्चू कडू यांच्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांचे आणि अपंगांचे हक्क मिळवून देणं आहे. कधी शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून तर कधी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या आंदोलक स्वभावामुळेच शेतकऱ्यांना आणि गरीबांना न्याय मिळवून देणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
राजकीय यश आणि आव्हानं
बच्चू कडू यांची लोकप्रियता आणि कार्यक्षमता पाहता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या मतदारसंघातून चौथ्यांदा विजय मिळवला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं. जलसंपदा, शालेय शिक्षण, महिला व बालविकास यासारख्या महत्वाच्या विभागांचा कार्यभार सांभाळताना त्यांनी आपल्या मतदारसंघात रोजगार मेळावे आणि जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी विविध उपक्रम राबवले.
बच्चू कडू हे महाराष्ट्रातील राजकारणात एक आदर्श आणि संघर्षशील नेता म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या जीवनात अनेक आव्हानं स्वीकारली, आंदोलनं केली, आणि लोकांच्या समस्यांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या अनोख्या कार्यपद्धतीमुळे त्यांचं नाव केवळ अमरावतीतच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात आदरानं घेतलं जातं. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत की अपंगांच्या हक्कांची लढाई, बच्चू कडू यांचा लढा सातत्याने सुरू आहे, आणि यामुळेच ते आजच्या महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जीवनात एक महत्त्वाची व्यक्ती बनले आहेत.
अजून काम बाकी आहे
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेत संख्या बळ हवे आहे. त्यामुळे बच्चू कडू सारखे नेते मोठ्या संख्येने तयार व्हावेत आणि त्यांनी एकत्रितरीत्या विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे गरजेचे आहे. सत्तेत येऊन स्वतः शेतकऱ्यांच्या बाजूने कायदे करणे आवश्यक आहे. म्हणूनच बच्चू कडू यांच्या संघटनेची व्याप्ती वाढत आहे. आज चांदा ते बांधापर्यंतचे तरुण बच्चू कडू यांची साथ द्यायला समोर येत आहेत. हे केवळ बच्चू कडू यांच्या प्रमाणिक कार्यामुळेच. हे तरुण जेव्हा बच्चू कडू यांच्या बरोबरीने सभागृहात जातील तेव्हा बच्चू कडू यांची ताकद आणखी वाढणार आहे. आता तो दिवस दूर नाही.












Click it and Unblock the Notifications