कृषीमंत्री धनंजय मुंडे पहाटे 3 वाजता जरांगेंच्या भेटीला; मराठवाड्यात राजकीय भूकंप, काय ठरलं!
Dhananjay Munde Meets Manoj Jarange : मराठवाड्यातील राजकीय वर्तुळात भूकंप आणणारी घटना रविवारी पहाटे घडल्याचे वृत्त समोर आले आहे. लोकसभेत बहीण पंकजा मुंडे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला चक्क भाऊ तथा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी रविवारी पहाटे तीन वाजता जाऊन थेट आंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांची भेट घेतली.
जवळपास अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. दरम्यान, जरांगे यांनी ही भेट केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असल्याचे म्हटले. परंतु या भेटीमागे नेमकं दडलंय काय, याची चर्चा आता रंगली आहे.

दुसरीकडे आज परळी शहरात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात घोंगडी बैठक होणार आहे. त्यापूर्वीच मुंडे यांनी जरांगे यांची थेट आंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतल्याने याला विशेष महत्त्व मानले जात आहे. यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिलेली नाही. परंतु, जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या भेटीमागील उद्देश स्पष्ट केला आहे.
भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही
पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी भेटीचा तपशील सांगितला. ते म्हणाले की, मी झोपेत होतो. पहाटेच्या तीन वाजता ते आले असतील. आमच्यामध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटं चर्चा झालेली आहे. मुळात आंतरवाली सराटीत कोणीही येऊ शकते. निवडणुकीच्या संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. मुळात आम्हाला कोणाला पाडायचं, कोणाला निवडून आणायचं हेच ठरलेलं नाही. आम्हाला तयारी करायची गरज नाही, सरकारने उद्या जरी निवडणूक घेतली तरी आम्ही तयार असल्याचे जरांगे म्हणाले.
मी ना महायुतीचा, ना मविआचा, मी समाजाचा
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मी माझ्या मुद्यांवर ठाम असून माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं ते फक्त ओबीसीतून त्यावर मी कायम ठाम असणार आहे. ज्यावेळी आमची आरक्षण संदर्भात चर्चा झाली तेव्हा व्यासपीठावर धनंजय मुंडे सुद्धा होते.
दुसरी बाब म्हणजे आज घोंगडी बैठक परळीत होत असून आणि ती ताकदीने होणार असल्याचे ते म्हणाले. दुसरी गोष्ट म्हणजे मी कोणाचाच हेऊ शकत नाही. कोणत्या महाविकास आघाडीचा, कोणत्या महायुतीचा मी अजिबात होणार नाही. मी फक्त मराठा समाजाचा आहे. मी अंतरवाली सराटीत मातृत्वाची भूमिका घेतो. त्यामुळे कोणी आले तरी त्याचे मनापासून स्वागत करतो.
चांगले काम करणाऱ्याचे कौतुक करायलाच हवे!
मनोज जरांगे यांनी सांगतिले की, कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांची चांगलं काम करायला लागली, तर कौतुक का करू नये? आमची आरक्षणावर चर्चा झाली. मला आरक्षणाशिवाय दुसरी वेळ नाही. समोरील व्यक्तीचं वेगळं असतं आणि माझं वेगळंच असतं असे त्यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications