Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी म्हणजे काय असते, हे आज कळतंय; सभागृहात फडणवीस भावूक

Devendra Fadnavis on Ajit Pawar Death : राज्य विधिमंडळाच्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात सोमवारी एका अत्यंत जड आणि विषण्ण वातावरणात झाली. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि दिग्गज नेते अजित पवार यांच्या निधनानंतर सभागृहात मांडण्यात आलेल्या शोक प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचे भावूक झाले होते. "एक सच्चा मित्र आणि सहप्रवाशाचा मृत्यू होणे ही केवळ राजकीय हानी नसून, ती अंत:करणाला वेदना देणारी वैयक्तिक जखम आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Devendra Fadnavis on Ajit Pawar Death

'अग्नी शरीर जाळतो, पण मित्रशोक आत्म्याला जाळतो'

आपल्या भाषणाची सुरुवात करताना फडणवीसांनी महाकवी भास यांच्या 'स्वप्नवासवदत्तम्' या नाटकातील एका प्रसिद्ध सुभाषिताचा दाखला दिला. ते म्हणाले, "लाकूड जळते तेव्हा अग्नी फक्त शरीर जाळतो. पण मित्रशोक हा हृदय आणि अंतस्थ आत्म्यालाही जाळतो. आज अजितदादांच्या निधनानंतर माझी अवस्था तशीच झाली आहे. काळ हा प्रत्येक जखमेवर औषध असतो असे म्हणतात, पण दादांच्या जाण्याने निर्माण झालेली ही वेदना कधीही कमी होणारी नाही.

रिकामी खुर्ची आणि अपूर्ण राहिलेला विक्रम

सभागृहातील वातावरणाचे वर्णन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, "आज बोलणं कुठून सुरू करावं, हेच सुचत नाहीये. मनात विचारांचे काहूर माजले आहे. सभागृहात नजर फिरवली की बाजूच्या खुर्चीवर दादा असायचे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कामकाज चालले तरी ते आपल्या जागेवरून हलत नसत. आज ती जागा रिकामी पाहताना मन सुन्न होतेय."

अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करताना फडणवीसांनी त्यांच्या हुकलेल्या विक्रमाचाही उल्लेख केला. "यावर्षी दादांनी आपला १२ वा अर्थसंकल्प मांडला असता आणि पुढच्या वर्षी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या सर्वाधिक अर्थसंकल्प मांडण्याच्या विक्रमाची त्यांनी बरोबरी केली असती. कदाचित ते राज्याच्या इतिहासात सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री ठरले असते, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. आज त्यांच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे, हे माझं दुर्दैव आहे," असे फडणवीस म्हणाले.

'गुलाबी जॅकेट' आणि 'लाडकी बहीण': आठवणींचा कोलाज

अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकताना फडणवीसांनी त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे कौतुक केले. कठोर निर्णय घेताना दादा कधीही डगमगत नसत, पण लोकहिताच्या कामात ते तितकेच हळवेही होते. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा आर्थिक भार मोठा असेल, असा सूर जेव्हा वित्त विभागातून उमटला, तेव्हा अजितदादांनी ठाम भूमिका घेऊन हा विषय मंत्रिमंडळात मार्गी लावला.

"लाडकी बहीण योजना सुरू झाल्यावर दादांनी गुलाबी जॅकेट घालायला सुरुवात केली होती आणि आम्हालाही आग्रह धरून ते घालायला लावले होते. आज त्या सर्व गोष्टी केवळ आठवणींच्या रूपात उरल्या आहेत," असे सांगताना मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.

पोकळीची नवी व्याख्या

भाषणाच्या शेवटी, राजकीय जीवनात 'पोकळी' या शब्दाचा वापर किती गांभीर्याने केला जातो, यावर त्यांनी भाष्य केले. "अनेकदा ज्येष्ठ नेते गेल्यावर आपण औपचारिकपणे 'पोकळी निर्माण झाली' असे म्हणतो. पण अजितदादांसारखा नेता, ज्याने राजकारण, सहकार आणि प्रशासन अशा सर्वच क्षेत्रांत आपले स्वतंत्र नेतृत्व आणि अस्तित्व निर्माण केले होते, असा माणूस जेव्हा अचानक सोडून जातो, तेव्हा 'पोकळी' निर्माण होणं म्हणजे नेमकं काय असतं, हे आज मला खऱ्या अर्थाने उमजलंय," अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+