शेवटच्या क्षणी फिरली गणिते, देवळालीतून राजश्री अहिररावांची चर्चा वाढली
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या नाशिकमधील देवळाली मतदारसंघात यंदा निवडणुकीत रंगत आली आहे. देवळाली मतदारसंघात 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सरोज अहिरे निवडून आल्या होत्या. अहिरे या सध्या अजित पवार गटात असल्याने त्यांना यंदा पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे योगेश घोलप आणि शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात मुख्य तिरंगी लढत होणार असली तरी इतर अनेक उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. या मतदारसंघावर असलेले शिवसेनेचे प्राबल्य पाहता, या मतदारसंघात अहिरराव यांचे पारडे सध्या जड दिसत आहे.
अहिरराव यांचे पारडे सध्यातरी जडच
या मतदारसंघात 2 लाख 84 हजार 299 मतदार आहेत. देवळाली मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे अहिरराव यांनी सांगितले. देवळाली मतदारसंघातील सुमारे पन्नासहून अधिक गावांत अहिरराव यांचे आत्तापर्यंत दौरे झाले आहेत. माजी तहसीलदार असलेल्या अहिरराव या आभ्यासू उमेदवार असल्याने व स्थानिक स्वराज्य संस्थेचा गाढा आभ्यास असलेल्या मतदार असल्याने त्यांच्या प्रचारदौऱ्याला अभूतपुर्व प्रतिसाद मिळत आहे. महिला व युवा वर्गाकडून अहिरराव यांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांचे पारडे सध्यातरी जडच दिसत आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित राहणार
गेल्यावेळी म्हणजेच 2019 मध्ये नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे नऊ आमदार विजयी झाले होते. नाशिक हा शिवसेनेचा गड मानला जातो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने मोहिमच उघडली. देवळालीतही अनेक पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात सामिल झाले. दोन्ही शिवसेनेकडून इच्छुकांची संख्या जास्त असली तरी शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री अहिरराव यांना उमेदवारी देण्यात आली. त्याविरोधात माजी आमदार घोलप यांना ठाकरे उमेदवारी दिली. मात्र ठाकरे गटातील इतर इच्छुक त्यामुळे नाराज झाल्याच्या चर्चा आहेत. त्याउलट अहिरराव यांना भाजपचे जोरदार सहकार्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादीतील नाराजांची साथ कुणाला
गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या आ. सरोज अहिरे यांना देवळाली कँम्प शहर, लगत भगूर शहर, दारणा पट्ट्यात मोठे मताधिक्य मिळाले होते. मात्र यावेळी शरद पवार गटाने आयोजित केलेली शिवस्वराज यात्रा मात्र खेड्यात गेली नाही. देवळाली विधानसभा मतदारसंघात 90 टक्के मतदार हा खेड्यात राहत असूनही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने या भागाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. याच नाराज मतदार ऐनवेळी अहिरराव यांना मतदान करतील, अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे.
आभ्यासू उमेदवाराचा शिंदे गटाला फायदा
अहिरराव या माजी तहसीलदार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. त्याशिवाय शिवसेना फुटीनंतर या भागात शिवसेना शिंदे गटाचे प्राबल्य वाढल्याचेही सांगितले जात आहे. खेड्याशी जोडलेली शिवसेनेची नाळ व महायुती सरकारने केलेली कोट्यवधींची विकासकामे ही अहिरराव यांच्यासाठी जमेची बाजू असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. याशिवाय पालकमंत्री दादा भुसे यांचेही ऐनवेळी सहकार्य मिळून त्यांना मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications