एकनाथ शिंदे पुन्हा नाराज ? हेलिकॉप्टरने दरेगावी दाखल, तीन दिवस असणार मुक्काम, राजकीय चर्चांना उधाण
Eknath Shinde : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आपल्या मूळ गावी असलेल्या सातारा जिल्ह्यातील दरेगावला पोहोचले आहेत. पुढील तीन दिवस शिंदे याठिकाणी मुक्काम करणार असल्याची माहिती आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजता मुंबईवरुन ते हेलिकॉप्टरने आपल्या गावी पोहोचले आहेत. त्याच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील आहेत. मात्र शिंदे अचानक आपल्या दरेगावी गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एका घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने ते दिवसभर गावी असणार आहेत. 18 तारखेला ग्रामदैवत येथे त्यांच्या हस्ते पूजा ठेवण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान शिंदे यांनी या भेटीचा तपशील आधी जाहीर न करता थेट गावात पोहोचल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काहींच्या मते ही भेट महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेद किंवा शिंदे यांच्या पुढील राजकीय हालचालींचा भाग असू शकते, असं म्हटलं जात आहे.

एकनाथ शिंदे हे मंगळवारी सकाळी अमरावती विमानतळ उद्घाटन कार्यक्रमानंतर मुंबईकडे निघाले आणि त्यानंतर थेट दरेगावला रवाना झाले. सायंकाळी ते गावात पोहोचले असून शिंदे यांचा दरेगावी तीन दिवसांचा मुक्काम असणार आहे. या कालावधीत ते स्थानिक कार्यकर्त्यांशी, गावकऱ्यांशी आणि पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शिंदे यांनी याआधी कोणतीही माहिती न देता भेट अचानक गावी गेल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सातारा जिल्ह्यातील दरेगाव हे शिंदे यांचे मूळ गाव आहे.
राजकीय चर्चा आणि तर्कवितर्क
शिंदे यांच्या या अचानक भेटीने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे. महायुती सरकारमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील अंतर्गत मतभेद आता उघड होत असल्याचे काहींचे मत आहे. विशेषतः, पालकमंत्री पदांच्या वाटपावरून शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वीच समोर आल्या होत्या. पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यावर शिंदे यांनी आपल्या समर्थकांना अपेक्षित संधी मिळाली नसल्याचे संकेत दिले होते, ज्यामुळे त्यांची नाराजी समोर आली होती. या पार्श्वभूमीवर दरेगाव भेट ही त्यांची राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो, असे काही राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
एकनाथ शिंदे राज ठाकरे यांची भेट
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर दोन दिवसांपुर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झाली. जवळपास दोन तास या दोन्ही नेत्यांमध्ये एकांतात चर्चा झाली. यावेळी सोबत खासदार श्रीकांत शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती होती. तर या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भेटीमागचा उद्देश सांगितला. ते म्हणाले की, तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु हे सत्य आहे. ही भेट केवळ सदीच्छा भेट होती.
दुसरीकडे, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. शिवाय विधानसभा निवडणुकी वेळी निर्माण झालेली कटूता दूर करण्यासाठी शिंदे यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. ही अनौपचारीक भेट असल्याचे दोन्ही पक्षांकडून स्पष्ट करण्यात आले. दोन्ही नेत्यांच्या भेटीने 'मन'भेद सरले की दबावाचं 'राज'कारण आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.












Click it and Unblock the Notifications