ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना झटका! निवडणूक आयोगाने पदावरुन हटवलं
Controversial DG Rashmi Shukla : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (ता. 4) राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मोठा झटका दिला आहे. आयोगाने त्यांची बदली केली असून, त्यांना राज्याच्या पोलिस महासंचालक या पदावरून हटवल आहे. दरम्यान राज्याच्या पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
फोन टॅपींग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडी सरकारने ठपका ठेवला होता. यानंतर त्यांच्यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात कारवाई सुरु झाली होती. पण महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांना राज्याचे पोलिस महासंचालक करण्यात आले होते. यानंतर इलेक्शन कमिशनने त्यांना आज पदावरुन हटवत कार्यवाही केली आहे.

सर्वांत वरिष्ठ IPS अधिकाऱ्याकडे महासंचालक पदाचा पदभार
काँग्रेस आणि इतर पक्षांच्या तक्रारींवरून केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिल्याचे केंद्रीय आयोगाने स्पष्ट केलेय. तसेच पोलिस महासंचालक शुक्ला यांची तत्काळ बदली करण्यात आली येत असून, पोलीस महासंचालकांचा पुढील पदभार सर्वांत वरिष्ठ IPS अधिकाऱ्याकडे सोपवलाय. यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांना उद्या दुपारी एक वाजेपर्यंत पर्यंत तीन आयपीएस अधिकाऱ्यांचे पॅनेल पाठवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगने केला होता महाराष्ट्र दौरा
राज्यातील विधानसभा निवडणूकांसाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौरा केला होता. यावेळी आढावा बैठका घेण्यात आल्या. दरम्यान काँग्रेसह अनेक विरोधी पक्षांनी पोलीस महासंचालकांना हटवण्याची मागणी केली होती. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या घोषणेच्यावेळी अधिकाऱ्यांना केवळ निष्पक्षपणे त्यांचे कर्तव्य पार पाडताना पक्षपातीपणा करू नये अशा इशारा देखील आयुक्तांनी दिला होता.
काँग्रेसकडून निर्णयाचे स्वागत
निवडणूक आयोगाने महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरुन बदली केल्याच्या निर्णयाचे काँग्रेस पक्षाने स्वागत केले आहे. सभागृहातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, आज महायुती सरकार बेईमान असल्याचे स्पष्ट झाले आहे. गंभीर आरोपांना सामोरे जाणाऱ्या पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ वाढवण्याची महायुती सरकारची काय मजबुरी होती? महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडू नयेत यासाठी सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती.
घटनाबाह्य पद्धतीने शुक्ला यांची नियुक्ती
विजय वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने होऊ नये म्हणून त्यांना सरकारने रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ दिली होती. असंवैधानिक मार्गाने आलेल्या सरकारने असंवैधानिक मार्गाने अधिकाऱ्यांना पदांवर बसवले होते हे आज स्पष्ट झाले असून मर्जीतील अधिकाऱ्यांना मुदतवाढ देऊन सत्तेचा दुरुपयोग महायुती सरकारने केला होता असेही ते म्हणाले.












Click it and Unblock the Notifications