शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नियंत्रण कक्ष
मुंबई: महाराष्ट्रात समाधानकारक पावसाला सुरुवात झाली आहे. यावर्षी चांगल्या पाउसमानाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. बळीराजा जोमाने कामाला लागला आहे. सरकार, प्रशासन यांनाही जाग आली आहे.

मंत्रीमहोदयानी मान्सूनच्या तयारीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. ज्यादा दराने खतांची आणि बियाणांची विक्री करणाऱ्यावर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार कामाला लागले आहे.
राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक (केवळ संदेश पाठविण्याकरिता) ९८२२४४६६५५ उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशके या निविष्ठांचा पुरवठा वेळेत तसेच गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे. यासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री (तोंडी तक्रार नोंदविण्याकरिता) १८००२३३४००० क्रमांकावरही संपर्क करता येईल. तसेच अडचण किंवा तक्रार [email protected] या ई-मेलवरही नोंदवता येईल.
संबंधितांनी व्हॉट्सॲप, टोल फ्री भ्रमणध्वनी क्रमांक तसेच ई-मेलवर अडचणी, निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकींग बाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना, नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशिल द्यावा. अडचणीबाबत माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवर पाठवल्यास तक्रारींचे निराकरण करणे सोयीस्कर होईल.
ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी वरील टोल फ्री क्रमांकावर संपर्क क्रमांकासह तोंडी तक्रारी नोंदवाव्यात. शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत नोंदवता येतील, असे कृषी संचालक विकास पाटील यांनी कळविले आहे.
अजित पवार, धनंजय मुंडे यांच्याकडून आढावा
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मंत्रालयीन दालनात नुकताच राज्यातील पाऊसमान, खते, बी-बियाणे पुरवठा, पीक कर्ज वितरण, टँकरची स्थिती, धरणांतील पाणीसाठा व विसर्गाचे नियोजन, पूर नियंत्रण, चारा उपलब्धता याबाबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला. बैठकीला महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आपल्या विभागाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तत्पूर्वी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी खरिपाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिले. पालकमंत्री या नात्याने त्यांनी बीड जिल्ह्यातील खरिपाच्या तयारीचा आढावा घेतला.












Click it and Unblock the Notifications