'कॉंग्रेस कार्यकर्त्यांना खाणारी चेटकीण म्हणजे भाजप'; प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा फडणवीसांवर निशाणा
Harshvardhan Sapkal : भाजपकडे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे दिग्गज नेते असले तरी निवडणुका जिंकण्यासाठी त्यांना कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचाच आधार घ्यावा लागतो. भाजप ही "काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते खाणारी चेटकीण" आहे, अशी उपमा देत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
हर्षवर्धन सपकाळ पुढे बोलताना म्हणाले की, भाजप आज विरोधकांना फोडण्याचे षड्यंत्र रचत आहे. काँग्रेसचे नेतृत्व फोडूनच भाजप निवडणूक जिंकतो, हे त्यांच्या मानसिकतेत बसले आहे. आम्ही या प्रकाराचा तीव्र निषेध करू लागलो आहे.

सामाजिक वातावरण बिघडवले जातंय!
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्राला महान संस्कृती व परंपरा लाभलेली आहे पण मागील काही वर्षात काही शक्ती जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या थोर परंपरेला कलंक लावत आहेत. राज्यात जातीपातीच्या वादास खतपाणी घालून सामाजिक वातावरण बिघडवले जात आहे.
शिव, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराच्या राज्यात महाराष्ट्र धर्मावर होणारे आक्रमण हा गंभीर प्रकार आहे. आक्रमण थोपवून महाराष्ट्र धर्म वाचवण्याची गरज आहे. संतोष देशमुखांसारख्या सरपंचाची हत्या करण्यात आली. आपल्याच जातीच्या माणसाकडून दुकानातून माल खरेदी करा असे सांगितले जाते, हे विदारक चित्र आता वाढीस लागले आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा. कॉंग्रेसमधून कोणी आले तरी तुमचा विचार अगोदर करणार, असे निर्देश चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आपला पक्ष संघटना वाढवण्यासाठी सर्वच पक्ष पक्षप्रवेश करून घेत असतात. विरोधकांमध्ये स्वतःची पार्टी वाढवण्याची क्षमता आता राहिली नाही. काँग्रेस पार्टीमध्ये काही शिल्लक राहिले नाही.
शरद पवार साहेबांकडे कोणी जायला तयार नाही. उद्धव ठाकरेंचा शिवबंधन तर सगळे विसरून गेले आहेत. त्यांना त्यांची पार्टी संभाळता येत नाही तर आम्ही काय करावे?, शिवसेना ठाकरे गटाचे लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत आणि आम्हाला सांगतात की उद्धव ठाकरेंनी वक्फ बोर्डाच्या विधेयकाला विरोध केला म्हणून आम्ही तुमच्या पक्षात येत आहोत.












Click it and Unblock the Notifications