गुन्हा करणारा 'पावरफूल' असला तरीही त्याला पाठीशी घालत नाही- एकनाथ शिंदे
मुंबई :- गुन्हा करणारा कितीही मोठा असला तरीही त्याला पाठीशी घातले जात नाही. अशी स्पष्टोक्ती वरळी हिट अँड रन प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी दिली. या अपघातात जीव गमवावा लागलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटूंबियांना विशेष बाब म्हणून 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
विरोधकांना सीएम शिंदेंचे उत्तर
वरळी येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शहा याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला. त्यावर स्पष्टीकरण देताना या प्रकरणात कोणी कितीही मोठा असला तरीही त्याला पाठीशी घातले जाणार नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

हे प्रकरण घडल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण पोलिसांना आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यावर आपण ठाम आहोत असेही शिंदे म्हणाले.
राजेश शहांची पक्षातून हकालपट्टी
वरळी हिट अँड रन प्रकरणी राजेश शहा यांचा मुलगा मिहिर हा आरोपी आहे. राजेश शहा यांनी त्याला मदत केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मिहीरला अटक झाली असून राजेश शहा यांनाही यापूर्वीच अटक झाली होती. या घटनेनंतर काल राजेश शहा यांना पक्षातून पदमुक्त केल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
नाखवा कुटुंबाचे भरुन न येणारे नुकसान
कावेरी नाखवा यांचा या अपघातत मृत्यू झाला. या प्रकरणात नाखवा कुटूंबाचे झालेले नुकसान कधीही भरून येणारे नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले तसेच मानवतेच्या दृष्टीकोनातून नाखवा कुटुंबियांना मदत जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही बाब जाहीर केली.
अनाधिकृत पब, बारवर कारवाई
मुंबई आणि इतर शहरात हिट अँड रन प्रकरणे वाढत असल्याने शहरातील बार, पब आणि मद्यविक्रीच्या दुकानांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच रात्री उशिरापर्यंत बार चालू ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनधिकृतपणे चालणारे बार आणि पब जमीनदोस्त करण्याचे निर्देश आपण संबंधित मनपा आयुक्तांना दिले असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. या प्रकरणांना आळा बसावा यासाठी ड्रिंक आणि ड्राइव्हची तपासणी आणि गस्त वाढवण्याचे निर्देशही ठाणे, पुणे, मुंबई पोलीस आयुक्तांना दिले असून ड्रिंक अँड ड्राइव्हच्या प्रकरणात कितीही मोठी व्यक्ती गुंतलेली असली तरीही तिला पाठीशी घातले जाणार नाही याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना केला.
काय आहे हिट अँड रन प्रकरण
रविवार (ता. 7) जुलैला वरळीतील कोळीवाडा परिसरात राहणारे प्रदीप नाखवा आणि त्यांची पत्नी कावेरी नाखवा हे मुंबईतील वरळीत असलेल्या मासळी बाजारात माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला जात होते.येथील प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला कार धडकली. या अपघातात दाम्पत्य कारच्या बोनटवर पडले पण प्रदीप नाखवा यांनी प्रसंगावधान राखत जीव वाचवला. पण कारने कावेरी नाखवा यांना फरफटत नेले. त्यात त्या ठार झाल्या होत्या.
माझी आई मला परत हवी
कावेरी नाखवा यांच्या मुलीला आपली आई या जगातून गेल्याचे अतीव दुःख झाले. वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यात ती आपली आई गेल्याने दुखी झाली असून मी रडलेले माझ्या आईला आवडणार नाही. पण मी प्रयत्न करूनही डोळ्यांतील अश्रू थांबवू शकत नाही. माझी आई माझे सर्वस्व होती. ती मला परत पाहिजे. माझी आई कधी परत येईल? असा काळजाला हात घालणारा प्रश्न सदर मुलगी विचारताना व्हिडिओत दिसून येत आहे.
डोळ्यात फक्त आसंवं..
अपघातातील प्रत्यक्षदर्शी आणि अपघातातील जखमी प्रदीप नाखवा यांनीही या घटनेचे अतीव दुःख झाले. मुलगी धायमोकलून रडत असताना त्यांनाही अश्रू अनावर झाले. तरीही ते मुलीला धीर देण्याचा प्रयत्न करीत होते. प्रदीप नाखवा यांनी आपला संताप व्यक्त केला असून त्यांनी आपला राग प्रशासनावर काढला आहे. प्रशासन केवळ श्रीमंतांचे आहे. या जगात गरिबांचा कुणीही वाली नाही. केवळ श्रीमंत लोकांचेच ऐकले जाते. या प्रकरणी सर्व राजकारण सुरू आहे, असे ते माध्यमांपुढेच आपले अश्रू ढाळताना म्हणाले.












Click it and Unblock the Notifications