आता राज्यात ‘लाडका शेतकरी अभियान' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा
परळी : लाडकी बहीण योजनेच्या यशनंतर शेतकऱ्याच्या लाभाच्या सर्व योजना राबवून लाडका शेतकरी अभियान राज्यात सुरु करणार. त्यासोबतच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यातील ई पिक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते (ता.२१ बुधवारी) रोजी परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली.
परळी येथे पाच दिवसीय कृषि महोत्सव 2024 चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय कृषि शिवराजसिंह चौहान , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि आमदार पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे असून आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीच्या काळात हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला. गतवर्षी सोयाबीन, कापूस पिकाला कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यासाठी आवश्यक ई-पीक पाहणी अहवाल अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले असल्याने आता ई-पीक पाहणी अहवालाची अट शिथिल करून सातबारा उताऱ्यावरील नोंदीनुसार अनुदान वाटप करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच लाडक्या भावांना विद्यावेतन देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली. आता याच धर्तीवर विविध लाभांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लाडका शेतकरी अभियान सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. याची सुरुवात आज नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून साडेसात एचपीच्या कृषिपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 'कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी' हेच शासनाचे धोरण असून राज्यातील कांदा, सोयाबीन, कापूस आणि दुधाला योग्य मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या सक्षमीकरणामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून ही योजना कायमस्वरूपी सुरु राहणार असल्याची ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच कृषि क्षेत्रातील नवीन बदलांची माहिती शेतकऱ्यांना मिळण्यासाठी, आधुनिक शेतीला चालना मिळून राज्यातील कृषि क्षेत्राचा विकास होण्यासाठी कृषि महोत्सव उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.












Click it and Unblock the Notifications