मंत्री माणिकराव कोकाटेंची नाराजी, तर मुख्यमंत्री फडणवीसांचे ठणकावून उत्तर; काय होतं नेमकं प्रकरण?
पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार गटाचे आमदार तथा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक धक्कादायक विधान केले. आमचे स्वीय सहाय्यक (पीएस) आणि विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) देखील मुख्यमंत्रीच ठरवत असल्यामुळे आमच्या हातात काही राहिलं नाही, असं म्हणत मंत्री कोकाटे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. कोकाटेंच्या याच नाराजीवर आता मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. "मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचाच आहे", असं मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावून सांगितलं.

काय म्हणाले होते मंत्री कोकाटे?
पुण्यातील एका कार्यक्रमात मंत्री कोकाटे यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं. ते म्हणाले होते की, "आम्हाला मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दम दिला. आता माझ्यासह तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल. विभागाचं काम शिस्तीत झालं पाहिजे. आम्हाला १०० दिवसांचा कार्यक्रम देखील दिला. आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्रीच ठरवतात, हे देखील मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे आमच्याही हातात काही राहिलं नाही. त्यामुळे आम्हाला नीट काम करावंच लागेल. ", असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं होतं.
काय दिलं फडणवीसांनी उत्तर?
मंत्री कोकाटे यांच्या विधानावर पत्रकारांनी मुख्मयंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं. त्यावर ते म्हणाले, "माणिकराव कोकाटेंना हे माहिती नसेल की मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचाच आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्यांकडे पाठवत असतात. त्यावर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेत असतात. हे काही आता नव्याने होत नाही. मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्हाला पाहिजे ती नावे पाठवा. पण त्या नावांमध्ये ज्यांची नावे फिक्सर म्हणून किंवा ज्यांची नावे चुकीच्या कामांमध्ये घेतले गेलेले आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही."
फक्त १०९ नावे क्लिअर
महायुती सरकारच्या मंत्र्यांचे खासगी सचिव, स्वीय सहाय्यक व विशेष कार्य अधिकारी अजून नेमलेले नाहीत. मंत्र्यांनी पाठवविलेल्या काही नावांना मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता, ते म्हणाले की, आतापर्यंत माझ्याकडे १२५ च्या जवळपास नावे आली आहेत. त्यातील मी १०९ नावे क्लिअर केली आहेत. राहिलेले नावे मी क्लिअर केलेली नाहीत. कारण कोणता न कोणता आरोप त्यांच्यावर आहे. तसेच कोणती न कोणती चौकशी त्यांच्यावर सुरु आहे. त्यामुळे कोणी नाराज झालं तरीही मी अशा नावांना मान्यता देणार नाही."












Click it and Unblock the Notifications