शपथविधी कधी? आणि कोण-कोण येणार? महायुतीच्या 'या' नेत्यानं सगळं सांगून टाकलं
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागून आता आठवडा होत आला आहे. मात्र तरीही नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी झालेला नाही. अगोदर मुख्यमंत्रीपदावरुन व त्यानंतर मंत्र्यांच्या खातेवाटपावरुन महायुतीत तू-तू मै-मै सुरु असल्याचं बोललं जातंय. मात्र या सगळ्या चर्चा फेटाळून महायुतीच्या बड्या नेत्याने आता थेट शपथविधीची तारीखच सांगून टाकली आहे.

कधी होणार शपथविधी?
महायुतीला 236 जागांववर विजय मिळाला. भाजपला सर्वाधिक 132, शिवसेना शिंदे गटाला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. महायुतीच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार, या चर्चा सुरु असतानाच आता शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे. ते म्हणाले, "सध्या चांगला मुहूर्त नाही. येत्या २ तारखेपासून चांगले मुहूर्त आहेत. त्यानंतर एखादा चांगला दिवस पाहून शपथविधी उरकला जाईल.", असे म्हणत दीपक केसरकर यांनी शपथविधीची हिंट दिली.
शिंदेंचा सन्मान हाच आमचा सन्मान
दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबतही भाष्य केलं. ते म्हणाले, "केंद्रातील मोदी सरकारसोबत एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा शिंदे साहेबांचा योग्य सन्मान ठेवतील. तसंच आम्हाला दिल्लीतून सांगण्यात आलं आहे. आम्हाला तेवढं पुरेसे आहे. एकनाथ शिंदे यांचा सन्मान म्हणजे आमचा सगळ्यांचा सन्मान आहे, असं स्पष्ट करत दीपक केसरकर यांनी नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा
केसरकर म्हणाले, लाडकी बहिण योजनेचा प्रोजेक्ट हा एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्या योजनेइतकी लोकप्रियता यापूर्वी कोणत्याही योजनेला मिळाली नाही. ठाकरेंबाबत बोलताना केसरकर म्हणाले, "उद्धव ठाकरे पॅलेसमध्ये राहतात. त्यांची पॅलेस पॉलिटिक्स आहे. त्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला आहे. आता आम्ही शिंदेंच्या मागे ठामपणे उभे आहोत. अमित शाह सांगतील, त्याप्रमाणे काम करायचं आहे. बाळासाहेबांच्या विचारावर चालायचं हे देखील आम्ही ठरवलं आहे", असेही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं.
शपथविधीला मोदी-शहा येणार
केसरकर म्हणाले, "येत्या २ तारखेपर्यंत कोणताही चांगला मुहूर्त नाही. सध्या मुहूर्तच नाही. २ तारखेनंतर जेव्हा चांगला मुहूर्त असेल तेव्हा सरकार स्थापन होईल. २ डिसेंबरनंतर कधीही सरकार स्थापन होऊ शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री अशी अनेक लोक या शपथविधीसाठी उपस्थितीत राहू शकतात. त्यांच्या सुविधेप्रमाणे सगळं ठरविला जाईल", असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications