औरंगजेब, छत्रपती संभाजीराजेंवर राज ठाकरेंचे मोठे विधान, ते नेमके काय म्हणाले? समजून घ्या 5 मुद्यांत
Raj Thackeray's big statement : सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या औरंगजेब आणि त्याची कबर यासंदर्भात मोठे वादंग झाले असून नागपूरमध्ये हिंसाचाराची घटनाही घडली. दरम्यान राज ठाकरेंनीही या विषयावर आपली सडेतोड मतं व्यक्त केली असून छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यासंदर्भात काही विधान त्यांनी केले आहे. ती नेमकी काय विधान आहेत, राज ठाकरे नेमके काय बोलले हे आपण जाणून घेऊया.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 30 मार्च 2025 रोजी मुंबईत मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्यासह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या वादावर राज ठाकरे यांनी मोठे भाष्य केले आहे.

1. औरंजेबाच्या मुलावर भाष्य
राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, "औरंगजेबाचं राज्य कुठपासून कुठपर्यंत होते? अफगाणिस्तानपासून दक्षिणेपर्यंत. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून महाराष्ट्रात परत आले, राज्याभिषेक झाला आणि काही काळानंतर महाराजांचं निधन झाले. या दरम्यानच्या काळात औरंगजेबाचा एक मुलगा दक्षिणेत आला. त्या औरंगजेबाच्या मुलाला छत्रपती संभाजीराजे यांनी जागा दिली म्हणजे शह दिला. 1681 ते 1707 म्हणजे 27 वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात लढत होता. छत्रपती संभाजीराजे यांच्याबरोबर औरंगजेब लढला. त्यांना क्रूर पद्धतीने मारलं. राजाराम महाराज, संताजी धनाजी, ताराराणी साहेब लढल्या. एका पुस्तकात एक फार चांगलं वाक्य आहे. मराठे सर्व लढाया हरत होते, पण औरंगजेब एकही लढाई जिंकू शकत नव्हता", असं राज ठाकरे म्हणाले.
2. .. ती गोष्ट औरंगजेबाला जमलीच नाही!
राज ठाकरे म्हणाले, "औरंगजेबाने तेव्हा परत जायला पाहिजे होते, पण तो महाराष्ट्रात ठाण मांडून का बसला होता? कारण औरंगजेबाला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता. पण हे औरंगजेबाला जमलेच नाही, सर्व प्रयत्न केले आणि शेवटी औरंगजेबचा येथेच मृत्यू झाला. जगाच्या इतिहासात औरंगजेबबद्दल जेव्हा वाचले जाते,तेव्हा जगातील लोकांना समजते की, औरंगजेब महाराष्ट्रात कशासाठी गेला आणि तिथेच कसा त्याचा शेवट झाला. तेव्हा तेथे जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव येते" असंही राज ठाकरे म्हणाले.
3. औरंगजेबच्या कबरीबाबत राज ठाकरेंचे महत्वाचे विधान
औरंगजेबाच्या कबरीबाबत राज ठाकरेंनी मोठे आणि महत्वाचे विधान केले, ते म्हणाले, "औरंगजेबाची सध्याची सजवलेली कबर काढून टाका. तेथे फक्त कबर दिसली पाहिजे आणि त्या ठिकाणी एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायाला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला. हा आमचा इतिहास आहे" असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे."
4. 'चित्रपटाने जागृत होणारे हिंदू कामाचे नाहीत..!'- राज ठाकरे
छावा चित्रपटानंतर राज्यात निर्माण झालेल्या वादावरुन राज ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले, "चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. चित्रपट थिएटरातून उतरला की हे सर्व उतरले. छत्रपती संभाजी महाराजाचे बलिदान तुम्हाला आता कळले का? विकी कौशलमुळे संभाजी महाराज समजले का? अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला? व्हॉट्सअपवर इतिहास नाही वाचता येत. इतिहास वाचण्यासाठी पुस्तकात डोके घालावे लागते."
5. ..त्यांना फक्त माथी भडकावयची एवढचं!
राज ठाकरे म्हणाले, "सध्या कुणीही इतिहासावर बोलतो. विधानसभेतही इतिहासावर बोलतात. औरंगजेबावर बोलतात. इतिहासातून जातीपातीत भिडवणे सोपे आहे. त्यांना राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. त्यांना संभाजी राजांशी काहीच कर्तव्य नाही आणि औरंगजेबाशी काही कर्तव्य नाही. तुमची माथी फक्त भडकवायची आहे."












Click it and Unblock the Notifications