संभाजीनगरचे सत्ताकारण: जंजाळांची एन्ट्री अन् शिरसाटांची नाराजी; शिंदेंच्या 'त्या' खेळीमागील गौडबंगाल
Sanjay Shirsat vs Rajendra Janjal : छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात शिवसेना आणि भाजप युतीचे समीकरण नेहमीच पेचात अडकलेले राहिले आहे. मात्र, राजेंद्र जंजाळ यांची उपमहापौर पदी झालेली निवड ही केवळ एक नियुक्ती नव्हती, तर तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या चाणक्यांनी रचलेला एक मोठा राजकीय डाव होता. या निर्णयामुळे आमदार तथा पालकमंत्री संजय शिरसाट उघडपणे नाराज झाले, ज्याचे पडसाद आजही स्थानिक राजकारणात उमटत आहेत.

राजेंद्र जंजाळांचे पद अन् संजय शिरसाटांचा संताप
राजेंद्र जंजाळ यांची उपमहापौर पदी वर्णी लागताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. संजय शिरसाट हे शहरातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री असूनही, महापालिकेच्या या महत्त्वाच्या निर्णयावेळी त्यांच्या शब्दाला वजन दिले गेले नाही. शिरसाट यांची नाराजी दोन कारणांमुळे होती. आपल्या मतदारसंघात आणि शहरात समांतर नेतृत्व तयार होऊ नये, अशी त्यांची भूमिका होती. जंजाळांना झुकते माप देणे म्हणजे शिरसाटांच्या प्रस्थापित राजकारणाला दिलेले आव्हान मानले गेले.
एकनाथ शिंदेंनी शिरसाटांना महापालिकेपासून दूर का ठेवले?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सावध पवित्रा घेत संजय शिरसाट यांना महापालिकेच्या या निर्णया प्रक्रियेपासून दूर ठेवले. यामागे काही ठोस रणनीती होती. शिरसाट आधीच मंत्री तथा पालकमंत्री म्हणून ताकदवान होते. महापालिकेची सत्ताही त्यांच्याच मर्जीतील व्यक्तीकडे गेल्यास पक्षात एकतर्फी सत्ताकेंद्र निर्माण होण्याची भीती होती. शिंदेंना शहरात नव्या दमाचे आणि आक्रमक नेते हवे होते, जे थेट लोकांशी जोडलेले आहेत. जंजाळ हे या चौकटीत फिट बसत होते.
बंडानंतरची बांधणी
शिवसेना फुटीनंतर प्रत्येक नेत्याला आपली ताकद सिद्ध करायची होती. शिंदेंनी जंजाळांना बळ देऊन शिरसाटांना हे सुचित केले की, निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार केवळ नेतृत्वाकडेच असतील.
भाजपचा डाव आणि राजकीय 'सफर'
या संपूर्ण नाट्यात भारतीय जनता पक्षाची भूमिका अत्यंत कळीची ठरली. भाजपने अत्यंत हुशारीने आपला 'चेकमेट' रचला होता. भाजपने शिवसेनेला (शिंदे गट) उपमहापौर पद देताना स्वतःसाठी महत्त्वाची पदे पदरात पाडून घेतली. शिरसाट अनेकदा भाजपवरही आक्रमक टीका करत असत. त्यामुळे त्यांना महापालिकेच्या राजकारणात मर्यादित ठेवण्यात भाजपला स्वतःचा फायदा दिसत होता. जंजाळ यांना पुढे करून भाजपने भविष्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी आपली 'स्पेस' सुरक्षित करून घेतली.
राजूरकर अन् जंजाळांची 'सरप्राईज' घोषणा
समीर राजूरकर यांच्या नावाचा दबदबा भाजपकडून होताच. अशातच शिवसेनेकडून अचानक राजेंद्र जंजाळ यांच्या नावाची घोषणा झाली. ही घोषणा म्हणजे एक 'पॉलिटिकल मास्टरस्ट्रोक' होता. जंजाळ यांचे नाव शेवटच्या क्षणी पुढे आणले गेले, जेणेकरून विरोधाला वेळच मिळू नये. राजूरकर आणि जंजाळ या जोडीने महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचा चेहरा अधिक आक्रमक केला. या घोषणेमुळे शिरसाट समर्थकांना मोठा धक्का बसला, कारण त्यांना अपेक्षित असलेल्या नावांना पूर्णपणे डावलण्यात आले होते.












Click it and Unblock the Notifications