शरद पवार यांच्या भेटीवर भुजबळ म्हणतात .....
मुंबई : रविवारी बारामती येथे शरद पवार यांच्यावर टीका करणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सोमवारी अचानक शरद पवार यांच्या घरी दाखल झाल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. भेटीची वेळ आधीच घेतलेली नसल्यामुळे पवारांनी भुजबळांना ताटकळत ठेवले, अशा बातम्या पसरल्यामुळे चर्चांना आणखीनच उधाण आले.

त्यातच उबाठा गटाचे नवनियुक्त विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार यांच्या भेटीचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आणि गोंधळ आणखीनच वाढला. पवारांची भेट घेतल्याशिवाय बाहेर पडणार नाही, अशी ठाम भूमिका भुजबळ यांनी घेतल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. अखेरीस तासाभराच्या प्रतीक्षेनंतर भुजबळ आणि पवारांची भेट झाली. या भेटी संदर्भात आता छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.
ही भेट राजकीय नसून राज्यात निर्माण झालेल्या सामाजिक स्थितीमध्ये पवारांनी लक्ष घालाव, अशी विनंती करण्यासाठीच ही भेट घेतल्याचे भुजबळ म्हणाले. पवारांची आधी वेळ न घेता मी त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. प्रकृती ठीक नसल्यामुळे ते झोपले होते. मी त्यांना जाग येण्याची वाट पाहिली. जाग आल्यानंतर त्यांनी मला बोलावलं. त्यानंतर आमची चर्चा झाल्याचे भुजबळ म्हणाले.
आपण कोणतेही राजकारण घेऊन आलेलो नाही तर या राज्याचा एक सामन्य आमदार म्हणून आलो आहे. या भेटीत माझी कोणतीही राजकीय भूमिका नाही. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनामुळे राज्यातील सामाजीक स्थिती सध्या स्फोटक झाली आहे. लोक जात पाहूनच व्यवहार करीत आहेत. एका जातीचा माणूस दुसर्या जातीतील माणसाशी व्यवहार करीत नाही. राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे ही ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे, असे पवारांना सांगितल्याचे भुजबळ म्हणाले.
सर्वपक्षीय बैठक घेण्याची विनंती
मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या आंदोलनात शरद पवार यांनीच निर्णायक भूमिका घेतली होती. त्या आंदोलनाने मराठवाडा पेटला होता. मात्र शरद पवार यांच्या हस्तक्षेपानंतर स्थिती निवळली. याची आठवण शरद पवार यांना करून दिल्याचे भुजबळ म्हणाले. येत्या एक दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करीन असे पवारांनी म्हटल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. आगामी कालखंडात सर्वपक्षीय बैठक घेण्याची सूचना त्यांना केली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
दरम्यान भुजबळ सकाळी सिल्व्हर ओक या पवारांच्या निवास स्थानी दाखल होताच विविध पक्षाच्या नेत्यांनी आपल्या प्रक्तीक्रिया देण्यास सुरुवात केली होती. आम्ही सारे काल बारामतीत होतो. त्यावेळी अशा भेटीची कोणतीही चर्चा झाली नाही, असे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. तर ही भेट राजकीय नसावी, अशी शक्यता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली होती.












Click it and Unblock the Notifications