नाराज छगन भुजबळांचा मोठा निर्णय..! आता येथून पुढे...
रविवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळालेले अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ नाराज होते. त्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली. शिवाय शपथविधी किंवा अधिवेशनाला न थांबता ते थेट येवल्याला निघून आले. आता याच नाराज भुजबळांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.

भुजबळांना डावललं
रविवारी देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. या विस्तारात ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र त्यात धक्कादायक रित्या छगन भुजबळांना डावलण्यात आलं. अजित पवार गटाच्या मंत्र्यांच्या कोट्यातून छगन भुजबळ व वळसे पाटलांना स्थान मिळालं नाही. त्यानंतर भुजबळ प्रचंड नाराज झाले. महायुतीने भुजबळांच्या ओबीसी मताचा फक्त निवडणुकीपुरता वापर केला असा आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. शिवाय स्वतः भुजबळांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली.
भुजबळ काय म्हणाले?
छगन भुजबळ मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थित न राहता थेट नाशिकला निघून आले. आता नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. छगन भुजबळ यांनी नागपूरला हिवाळी अधिवेशनाला जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, "मी उद्या येवला-लासलगाव येथे जाऊन लोकांशी बोलणार आहे. समता परिषदच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलणार आणि मग ठरवणार आहे. मी आता अधिवेशनाला जाणार नाही", असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
भुजबळांच्या निर्णयाकडे लक्ष
नाराज भुजबळ आता काय निर्णय घेतील..? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. विशेष म्हणजे भुजबळांनी नागपूर अधिवेशनाला न जाण्याचा निर्णय हा देखील एक मोठा निर्णय समजला जात आहे. नाराज छगन भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. छगन भुजबळांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये येत्या 18 डिसेंबरला बुधवारी सकाळी 11 वाजता मेळावा होणार आहे. राज्यभरातील समता परिषदेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या मेळाव्याा उपस्थित राहणार आहेत. नाराज छगन भुजबळ मेळाव्यात काय निर्णय घेतात? याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे.
शरद पवार गटात जातील?
नागपूरात ३३ वर्षांपूर्वी भुजबळांच्या बंडामुळे शपथविधी घेण्यात आला होता. आता ३३ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालेल्या नागपूरच्या मंत्रीमंडळ विस्तारात भुजबळांना डावलण्यात आले. त्यामुळे आता नाराज भुजबळ बंड पुकारतील का, हा खरा प्रश्न आहे. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते आहेत. विशेष म्हणजे ते प्रचंड अनुभवी आणि अभ्यासू नेते आहेत. त्यामुळे त्यांनी बंडाचा निर्णय घेतला तर राष्ट्रवादी पक्षाची वैयक्तिक मोठी हानी होऊ शकते. भुजबळांच्या हालचाली पाहता ते शरद पवार गटात जातील का, हा प्रश्नही आता विचारला जाऊ लागला आहे.












Click it and Unblock the Notifications