आरक्षण मिळाले म्हणजे नोकरी मिळते हे त्याला कोणी सांगितले..? भुजबळांची पुन्हा जरांगे यांच्यावर टिका
बाकीच्यांना आरक्षण मिळाल्यावर त्यांची आंदोलने थांबली. मात्र जालन्याचा गडी ऐकायलाच तयार नाही, असं म्हणत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर तोफ डागली. बुलढाणा येथील शेगावमध्ये माळी समाजाच्या कार्यक्रमानिमित्त भुजबळ आले होते. त्यावेळी ते बोलत होते. भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा जरांगे-भुजबळ हे वाकयुद्ध पहायला मिळणार आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ?
यावेळी जरांगे यांच्या आगामी आंदोलनाबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, आरक्षणासाठी मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले. तसेच मोर्चे गुजरातमध्ये पाटीदार समाजाने काढले होते. त्यांना दहा टक्के, साडेआठ टक्के आरक्षण दिल्यावर ते मोर्चे थांबले. मात्र हे थांबायलाच तयार नाही. मी मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात नाही. फक्त त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, एवढंच माझं म्हणणं आहे, असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
जरांगेबाबत काय म्हणाले?
आपल्या भाषणात भुजबळ यांनी जरांगे यांच्याबाबतही वक्तव्य केलं. ते म्हणाले, स्वतंत्र आरक्षण दिलंय तरी हा गडी ऐकायला तयार नाही. माझी नक्कल करतोय. माझ्या लेकराबाळांना द्या म्हणतोय. आरक्षण मिळाले म्हणजे नोकरी मिळते, हे त्याला कोणी सांगितलंय..? असा चिमटा काढत ते म्हणाले की, आपली लढाई अजून संपलेली नाही. आपल्याला भविष्यात पुन्हा लढावं लागणार आहे.
लढाई चालूच ठेवणार
आपल्या भाषणात भुजबळांनी आपली लढाई संपलेली नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, इतर समाजाला सरकारकडून शिक्षणसह इतर गोष्टींसाठी पैसा मिळतो. तसा पैसा ओबीसी समाजाला मिळत नाही. बीडमध्ये क्षीरसागर यांचे घर जाळले. त्याचा त्रास त्यांच्या घरातील सर्वांनाच झाला. घरात लहान लेकरं होती. त्यांना मुस्लिम समाजातील मुलांनी वाचविले. आमच्या कार्यकर्त्यांचे घर जाळले, हॉटेल जाळले, प्रकाश सोळंके यांचेही घर जाळले. अनेक ठिकाणी गट तयार होते. प्रत्येक गटाला कोड ठरलेला होता, असा आरोप भुजबळांनी केला.












Click it and Unblock the Notifications