विरोधकांच्या तोंडांच्या वाफांना शिंदेंनीच उत्तर दिलं; बानवकुळेंनी पत्रकार परिषदेत सगळंच काढलं
chandrashekhar bawankule press conference- महायुतीच्या केंद्रीय नेत्यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे ठामपणे उभे राहिलेत. हा त्यांचा मोठेपणा आहेच, पण आज त्यांनी मविआने उठवलेल्या वावड्यांना सडेतोड उत्तर दिले, हे महत्त्वाचं आहे, असं प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. महाविकास आघाडीकडून एकनाथ शिंदे यांच्याबाबत ज्या चुकीच्या बातम्या पेरल्या होत्या त्या आता तरी थांबतील, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

बावनकुळेंनी केले शिंदेंच्या भुमिकेचे स्वागत
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे स्वागत केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्णयाला एकनाथ शिंदे यांचं पूर्ण समर्थन आहे. यापूर्वी महायुतीबाबत वावड्या उठवून शिंदे यांच्या नाराजीबाबत मविआकडून आत्तापर्यंत अनेकदा तोंडाच्या वाफा काढल्या जात होत्या. मात्र आज एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करुन मविआला सडेतोड उत्तर दिलं.
एकनाथ शिंदे हे महायुतीचे नेते
बावनकुळे पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे हे रडणारे नाही तर लढणारे नेते आहेत. गेल्या अडीच वर्षांत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला पुढे नेण्याचेच काम केले. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय दिला. मराठा, ओबीसी याबरोबरच महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेला महायुती सरकारने न्याय दिला. शिंदे, फडणवीस आणि अजितदादांनी तिघांनीही महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेली. त्यामुळे ते महायुतीत कायम होते व राहिले. मात्र मधल्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या पसरविल्या. मात्र आता स्वतः शिंदे यांनी या प्रश्नांना उत्तरे दिली व महायुती किती घट्ट आहे हे दाखवून दिले, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
उद्या तिन्ही नेते जातील दिल्लीला
बानवकुळे यांनी सरकार स्थापनेबाबतही माहिती दिली. ते म्हणाले, उद्या महायुतीच्या तिन्ही पक्षाचे नेते दिल्लीला जातील. मोदीजी व अमित शहाजींसोबत तेथे बैठक होईल. तेथेच मुख्यमंत्री कोण व कुणाला किती मंत्रीपदे याचा निर्णय होईल. या सगळ्या प्रक्रियेत आमचे तिन्ही नेते सोबत असतील. ते सोबत आहेतच, यासाठीच आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. केंद्रातील भाजप सरकार हे विकासाचं सरकार आहे. त्याच सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे सरकारने विक्रमी विकासकामे केली. त्यामुळे आताही महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी हे तिन्ही नेते एकत्रच राहतील, असेही वावनकुळे यांनी स्पष्ट केले.












Click it and Unblock the Notifications