'संघबंदीची मागणी करणारे मूर्ख आणि राष्ट्रद्रोही': चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांवर हल्लाबोल!
Chandrashekhar Bawankule attacks opposition Over RSS Ban Demand : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या राष्ट्रभक्ती आणि समाजसेवेसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांवर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (२३ ऑक्टोबर २०२५) जोरदार टीका केली आहे. भंडाऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, संघावर बंदी घालण्याचा विचार करणारे लोक 'मूर्ख' आणि 'राष्ट्रद्रोही' असल्याचा सणसणीत टोला लगावला.
बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात राष्ट्रभावना निर्माण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकसित भारत' संकल्पनेत संघाची विचारधारा प्रतिबिंबित होते. "त्यामुळे जो कोणी संघावर बंदी घालण्याचा विचार करतो, तो खरं तर राष्ट्रद्रोही आहे," असे कठोर मत त्यांनी व्यक्त केले.
एका बाजूला संघावरील टीकेला त्यांनी राष्ट्रद्रोह म्हटले, तर दुसऱ्या बाजूला त्यांनी महायुती सरकारच्या शेतकरीधोरणाचे समर्थन करत विरोधकांच्या आरोपांनाही चोख प्रत्युत्तर दिले.

शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींचे ऐतिहासिक पॅकेज
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे यांनी महायुती सरकारने दिलेल्या मदतीचा आकडा स्पष्ट केला. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांना ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले नव्हते.
"हे पॅकेज शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे ठरणार असून, रब्बी हंगामासाठी आवश्यक भांडवल उभे करण्यास मदत करेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, "आम्ही शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान भरून काढू असं म्हणत नाही, पण हे पॅकेज शेतकऱ्याला नव्याने उभं राहण्याची ताकद देईल."
यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या 'शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली' या आरोपालाही उत्तर दिले. "महाराष्ट्र सरकारने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना केल्या आहेत. विरोधक फक्त टीका करतात, पण त्यावरील उपाय दाखवत नाहीत," असे बावनकुळे म्हणाले.
'मत चोरीचे आरोप म्हणजे विरोधकांची निराशा'
निवडणुकांमध्ये मत चोरी (EVM गैरव्यवहार) झाल्याच्या विरोधकांच्या वारंवारच्या आरोपांवरही महसूलमंत्र्यांनी पलटवार केला. त्यांनी स्पष्ट केले की, हे आरोप म्हणजे विरोधकांची राजकीय निराशा आहे.
"नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे इतर नेते खासगीत आपला पराभव मान्य करतात. पण कार्यकर्त्यांना टिकवण्यासाठी ते लोकांसमोर मत चोरीचे खोटे आरोप करतात," असे बावनकुळे म्हणाले. जनता आता महायुतीच्या मागे खंबीरपणे उभी असल्याने, विरोधकांना आपला पक्ष आणि कार्यकर्ते टिकवण्यासाठी अशा 'खोट्या गोष्टींचा आधार' घ्यावा लागत आहे, अशी टीका त्यांनी केली.
संजय राऊतांना टोला: 'दिवसभर फटाके फोडण्याचे काम त्यांच्यावर सोडा'
यावेळी पत्रकारांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या टीकेबद्दल विचारले असता, बावनकुळे यांनी मिश्किल शैलीत प्रतिक्रिया दिली. "कोण संजय राऊत? त्यांना उठल्यावर दिवसभर फटाके फोडायचे असतात. दीपावलीचा दिवस आहे, म्हणून फार सिरीयस होऊ नका. आम्हाला विकासाच्या राजकारणात भंडारा जिल्ह्याला पुढे न्यायचं आहे, बाकी फटाके फोडण्याचं काम त्यांच्यावर सोडा," असे म्हणत त्यांनी राऊत यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचा संकेत दिला.












Click it and Unblock the Notifications