खरं काय? खोटं काय? 150 रुपये कमाविण्याच्या नादात अभिनेता सागर कारंडेने गमावले 61 लाख; प्रकरण काय?
चला हवा येऊ द्या फेम हास्यकलाकार सागर कारंडे यांच्याबाबत एक मोठी बातमी सध्या महाराष्ट्रात चर्चेत आली आहे. सागर कारंडेची तब्बल ६१ लाखांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार सायबर पोलिस ठाणे उत्तर विभाग येथे दाखल झाली. हा गुन्हा नोंद झाल्याबरोबर या प्रकरणाची चर्चा वाढली. आता फिर्यादीत सांगितल्याप्रमाणे 'इन्स्टाग्रामवरील पोस्टला लाईक करून दीडशे रुपये मिळवा' या आमिषाला बळी पडल्यानं हा प्रकार घडला असा दावा करण्यात आलाय. हे प्रकरण नेमकं काय आहे, हेच आपण पाहूयात...

नेमकं काय झालंय?
फेब्रुवारी महिन्यात अभिनेता सागर कारंडेला त्याच्या व्हॉट्सॲपवर एका महिलेचा मॅसेज आला. या महिलेनं टेलिग्राम आणि काही समाजमाध्यामांवर इन्स्टाग्राम लिंक पाठवत त्यावर लाईक करण्यास सागरला सांगितलं होतं. या महिलेनं प्रत्येक लाईकचे 150 रुपये दिले जाईल आणि घरबसल्या 6,000 पर्यंत कमाई करता येईल, असं देखील म्हटलं होतं, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
कसा झाला सायबर क्राईम ?
त्यानंतर सागर कारंडेनं तिच्या सर्व अटी मान्य केल्या आणि यावर काम करणं सुरू केलं. यानंतर विविध कारणांनी पैसे गुंतवायला लावून सायबर भामट्यांनी त्याची फसवणूक केली. याप्रकरणी आधी सागरला सुरुवातीला 11 हजार रुपये दोन वेळा मिळाले. यानंतर त्याची खात्री झाली की, यामध्ये काही धोका नाही. यानंतर त्याला अधिक पैसे कमवण्यासाठी काही पैसे गुंतवणूक करावी लागेल, असं सांगण्यात आलं. यावर सागरनं थोडी रक्कम गुंतवली. भामट्यांनी तयार केलेल्या वॉलेटवर कमिशन आणि मोबदला जमा झाला.
61 लाख कसे गेले?
पुढं सागरनं स्वत:चे 27 लाख रुपये गुंतवले. पैसे काढताना 80 टक्के टास्क पूर्ण आहे. 100 टक्के पूर्ण झाल्यानंतर पैसे काढता येईल असं सांगण्यात आलं होतं. यानंतर सागरला आणखी 19 लाख आणि त्यावरचा 30 टक्के कर भरण्यास सांगितलं गेलं होतं. या सायबर भामट्यांनी त्याच्याकडून एकूण 61 लाख रुपये घेतले. कर चुकीच्या खात्यात भरण्यात आला, असं त्याला सांगण्यात आलं. त्याला पुन्हा पैसे मागितले गेले. यानंतर सागरला हे थोड विचित्र वाटू लागलं, त्याला समजलं की,फसवलं जात आहे. पुढं त्यानं सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली. असे काही खोटे दावे केले गेले होते.
सागर कारंडेचे म्हणणे काय?
नाशिकमधील एका कार्यक्रमात पत्रकारांनी सागर कारंडे याला याबाबत प्रश्न विचारला. त्यानंतर सागर कारंडेनं स्पष्ट केलं आहे की, दुसऱ्याच एका सागर कारंडेच्या नावानं त्याच्या बातम्या दिल्या जात आहेत. सध्या त्याला काही न करता कठीण काळातून जावं लागत आहे. याशिवाय खोट्या बातम्या देणाऱ्यांना तो नोटीस पाठवणार, असल्याचंही सागर कारंडेनं स्पष्ट केलंय. सोशल मिडीयावर सागर कारंड़े असे टाकल्यावर कित्येक जणांची नावे सारखीच येतात, असंही सागर कारंडे यांने सांगितले आहे.












Click it and Unblock the Notifications