जातीय संघर्षात महाराष्ट्र पेटत राहावा हा मविआच्या नेत्यांचा नीच हेतू - भाजपच्या या नेत्याचा हल्लाबोल
मुंबई- मराठा आरक्षणाबाबत मविआचे पुतना मावशीचे प्रेम दिसून आले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवारांनी मराठा आरक्षणावरील चर्चेपासून पळ काढू नये. मुळातः महाराष्ट्रात जातीय संघर्ष राहावा, महाराष्ट्र पेटत राहावा हा नीच विचार महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात असल्याचा आरोप भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केला.
आरक्षण बैठकीला मविआ नेते गैरहजर
काल मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनुपस्थिती दर्शवली. या पार्श्वभूमीवर भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज विरोधकांवर टिकास्त्र डागले आहे. मराठा आरक्षणाबाबतचे महाविकास आघाडीचे पुतना मावशीचे प्रेम दिसून आले, असे दरेकर म्हणाले. तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाविषयी आपली भुमिका स्पष्ट करावी असा टोलाही दरेकरांनी लगावला.

..म्हणून बैठक घेतली
माध्यमांशी संवाद साधताना प्रवीण दरेकर म्हणाले, सरकारने पुढाकार घेऊन आरक्षणाविषयी मार्ग काढावा आणि जातीय तेढ निर्माण झालेय ते संपवावे असा ज्येष्ठत्वाचा सल्ला शरद पवारांनी दिला होता. उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षण आणि ओबीसी विषय सोडवावा अशा प्रकारची भुमिका मांडताहेत. महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षाची मागणी, महाराष्ट्रातील वातावरण सलोख्याचे व्हावे याबाबत पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली होती.
ते जाणीवपूर्वक बैठकीला गैरहजर
प्रवीण दरेकर म्हणाले, विरोधी पक्षाचे नेते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते जाणीवपूर्वक बैठकीला उपस्थित नव्हते. हा प्रश्न असाच भिजत राहावा आणि त्या आधारे महाराष्ट्रात जातीय संघर्ष राहावा, महाराष्ट्र पेटत राहावा, त्या पेटलेल्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भाजावी, अशा प्रकारचा नीच विचार मविआच्या नेत्यांच्या मनात असल्याचे कालच्या अनुपस्थितीवरुन दिसून आल्याचेही दरेकर म्हणाले.
विरोधक नीच राजकारण करताहेत
प्रवीण दरेकर म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी या पक्षांची नेमकी काय भुमिका आहे ती लेखी स्वरूपात मागवा. ह्यांचे खरे रूप महाराष्ट्रातील जनतेसमोर येऊ दे असे बैठकीत सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या सर्व पक्षांकडून लेखी भुमिका मागण्याचे ठरवले. त्यामुळे आज आम्ही विधानपरिषदेत हा विषय मांडला. काल शरद पवार, उद्धव ठाकरे नेमके का अनुपस्थित होते? काँग्रेसचे नेते का येऊ शकले नाहीत? याचा अर्थ त्यांना हे वातावरण असेच धगधगते राहावे, आपला काही स्वार्थ साधता येतोय का? एवढे नीच राजकारण करताना विरोधक दिसताहेत.
आरक्षणावर मविआची भूमिका काय?
प्रवीण दरेकर म्हणाले, काल आणि आज महाराष्ट्रातील जनतेसमोर त्यांचे खरे रूप समोर आले आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांची ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत काय भुमिका आहे. यातून काय मार्ग काढायला हवा? हे सांगावे. चर्चेपासून पळ काढू नका. जितके पळाल तितका तुमचा ढोंगीपणा महाराष्ट्रातील जनतेसमोर येईल, असा घणाघातही दरेकरांनी केला.












Click it and Unblock the Notifications