बांगलादेशात आपल्या लोकांना ठार मारताहेत, मंदिरं तोडली हे उद्धव ठाकरेंना दिसत नाही- वाचा कोण म्हणालं?
मुंबई: 'बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं आपल्या लोकांना दिवसाढवळ्या ठार मारलं जात आहे. मंदिरं तोडली जात आहेत. हे उध्दव ठाकरे यांना दिसत नाही. त्यांचे नेते सकाळ-दुपार पत्रकार परिषदा घेतात तरीही त्यांना दिसत नाही अशी बोचरी टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी केली.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सचिन वाझेंचं केलेलं समर्थन, सचिन वाझे बाहेर काढत असलेले भ्रष्टाचार, सचिन वाझे यांनी मोठे पवार यांचं घेतलेलं नाव, अनिल देशमुखांवरील आरोप, जयंत पाटील यांच्यावरील आरोप, जयंत पाटील शांत का? असे प्रश्न आमदार राम कदम यांनी उपस्थित केले.

सामनात एक ओळही छापली नाही - राम कदम
बांगलादेशातील आपल्या लोकांवरील अत्याचाराबद्दल सामनामध्ये एक ओळ छापून येत नाही, काय कारण ? हेच आहे त्यांचं हिंदुत्व? आहे का, ही त्यांची असली शिवसेना? आहे का असा सवालही राम कदम यांनी केला.
काय म्हणाले राम कदम?
राम कदम यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नकली शिवसेना या वक्तव्याची आठवण करुन दिली. ही नकली शिवसेना आहे, कोणता मोठा पुरावा पाहिजे अजून तुम्हाला नकली शिवसेनेचा असे म्हणत ठाकरेंचे जेव्हा खासदार निवडून आले, तेव्हा खासदारांच्या विजयी मिरवणूकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले असा आरोपही त्यांनी केला.
उद्धव ठाकरेंना दिल्लीला भेटायला जाव लागतं
बाळासाहेब ठाकरे असताना देशभरातील नेते त्यांना भेटायला मुंबईत येत. आता ही नकली शिवसेना आहे, यांच्या नेत्यांना आता दिल्लीत जावं लागत आहे,' असा टोलाही आमदार राम कदम यांनी आज लगावला.
सामनात आलं छापून..!
आमदार राम कदम यांनी असं सांगितलं असलं, तरी बांगलादेशमधल्या परिस्थितीबद्दल आजच्या दैनिक सामनामध्ये बांगलादेशातील उलथापालथ 'लढाऊ बेगम'चे पलायन हे संपादकीय प्रसिद्ध झालं असून 'हसीनाचे पलायन' आणि ' देश का सोडावा लागला?' या बातम्या आहेत.
उद्धव ठाकरे आजपासून दिल्ली दौऱ्यावर
पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात उध्दव ठाकरे कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.












Click it and Unblock the Notifications