राहूल गांधीं विरोधात राज्यभर भाजपचे आंदोलन, बावनकुळे म्हणाले- गांधींचा आरक्षणविरोधी कुटील वारसा
अकोला : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधींच्या आरक्षण विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपा नेते, कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. अमेरिका दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबत वक्तव्य केले होते. आरक्षणासंदर्भात केलेल्या या विधानानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपतर्फे आंदोलन करण्यात येत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोल्यात तर आशिष शेलार आणि पंकजा मुंडे यांनी मुंबईत आंदोलन केले तर. पुण्यात भाजपच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
गांधींचा आरक्षणविरोधी कुटील वारसा- बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे यांनीअकोला येथे आंदोलनात सहभागी होऊन राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला. पंडित नेहरू, राजीव गांधी यांनी आरक्षणाला विरोध केला, तोच आरक्षणविरोधी कुटील वारसा राहुल गांधी पुढे नेत आहेत. त्यांना या देशातील जनता चांगलाच धडा शिकवेल हा मला विश्वास आहे. असे बावनकुळे म्हणाले.

जनता निवडणूकीत कॉंग्रेसला नक्कीच उत्तर देईल- शेलार
भाजप नेते आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा अनुसूचित जाती मोर्चा मुंबईच्या वतीने भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घाटकोपर येथे आम्ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करुन निषेध नोंदवला. यावेळी शेलार म्हणाले की, महामानव भारतरत्न परमपूज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या संविधानाच्या विरोधात राहुल गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेचा आम्ही जाहीर निषेध करतो. राहुल गांधी यांचा आणि कॉंग्रेसचा खरा चेहरा आता जनतेसमोर उघड झालाय आणि महाराष्ट्राची जनता येणाऱ्या निवडणुकांमध्ये कॉँग्रेसला याचं उत्तर नक्कीच देईल.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण कधीपर्यंत सुरू राहणार? या एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोठं विधान केले. जेव्हा भारतात आरक्षणाच्या दृष्टीने समानता असेल, तेव्हाच काँग्रेस पक्ष देशामधील आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत विचार करेल. सध्यातरी अशी स्थिती नाही, असे राहुल गांधी यांनी उत्तर देताना म्हटले होते.
तसेच राहुल गांधी यांनी परदेशात त्यांच्या एका वक्तव्यात म्हटले होते की, भारतात विषमता आहे. भारतात कधी विषमता आणि सामाजिक भेदभाव संपुष्टात आला तर आरक्षण संपवण्याचा विचार केला जाऊ शकतो, मात्र भाजपने राहुल गांधींच्या या वक्तव्याचा समाचार घेत काँग्रेस दलित आणि जमातींना दिलेले आरक्षण संपवण्याचा विचार करत आहे असा आरोप केला. आरक्षणावर राहुल गांधींनी दिलेल्या वक्तव्यावर भाजप आक्रमक झाले, ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना दिलेले आरक्षण संपविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.












Click it and Unblock the Notifications