फडणवीस मला म्हणाले, आठ दिवस थांबा, मग... भुजबळांची भेटीनंतरची पहिलीच प्रतिक्रिया
जहाँ नही चैना, वहा नही रहना...असं सूचक विधान करत, थेट अजित पवारांवर नाराजी व्यक्त करणारे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज सागर बंगल्यावर पोहोचले. तेथे सुमारे तासभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर बंगल्याबाहेर आल्यावर भुजबळांनी या भेटीचे कारण सांगितले. ही भेट कशासाठी होती त्याबद्दल माहिती दिली. या भेटीनंतर भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

भुजबळ काय म्हणाले
छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर भुजबळ म्हणाले, फडणवीसांची राजकीय व सामाजिक मुद्यांवर भेट घेतली. सध्या काय झाले व काय सुरु आहे, हे मी फडणवीसांना सांगितलं. विधानसभा निवडणुकीत जो विजय मिळाला त्यात ओबीसींचा मोठा वाटा होता, हे फडणवीसांनी मान्य केले. ओबीसींचा महायुतीला आशीर्वाद मिळाल्याचेही फडणवीसांनी मान्य केले. त्यामुळे भविष्यात ओबीसींवर अन्याय होणार नाही, अशी शाश्वती आपल्याला फडणवीसांनी दिल्याचे भुजबळांनी सांगितले.
फडणवीसांनी मागितली वेळ
भुजबळ पुढे म्हणाले, ओबीसी नेत्यांच्या सुरु असलेल्या बैठकांबाबतही फडणवीसांची चर्चा केली. माझ्यावर अन्याय झाला, असे ओबीसी नेत्यांचे म्हणणे असल्याचे मी सांगितले. त्यावर सध्या काय सुरु आहे, याची आम्ही चर्चा केली. आठ- दहा दिवसांनी पुन्हा भेटू व चांगला मार्ग काढू, असे आश्वासन फडणवीसांनी दिले. मी याबाबत साधकबाधक चर्चा करत आहे, असा निरोप ओबीसी नेत्यांना द्या, अशी विनंतीही फडणवीसांनी केल्याचे भुजबळांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
भाजपात जाण्याच्या चर्चा
अजित पवार गटात नाराज असलेले भुजबळ आता भाजपात जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर, काय चर्चा झाली ती मी तुम्हाला सांगितली. आता तुमच्या प्रश्नाबाबत मला जास्त बोलायचं नाही, असं म्हणत भुजबळांनी या प्रश्नाला बगल दिली. मात्र भुजबळ आता लवकरच भाजपात येतील, अशीही चर्चा सुरु झाली आहे.












Click it and Unblock the Notifications