पालकमंत्र्यांच्या झेंडावंदनानंतर भरत गोगावलेंचा संताप; सुनील तटकरेंचे नाव न घेता टोला
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन सध्या चांगलीच धुसफूस सुरु आहे. आज प्रजासत्ताकदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आल्याने भरत गोगावले चांगलेच संतापले. रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र स्थगिती देण्यापूर्वीच झेंडावंदन पुर्वीच्या मंत्रीच करतील, असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मंत्री अदिती तटकरे यांनी झेंडावंदन केलं. मात्र त्यानंतर भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

काय म्हणाले गोगावले?
पालकमंत्रीपदाच्या वादाबाबत गोगावले म्हणाले, मंत्री म्हणून त्यांनी झेंडावंदन केलं. त्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही. पुढे बोलताना मात्र गोगावलेंनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला. तटकरेंचे नाव न घेता जो भावाचा झाला नाही, तो आमचा काय होणार, असा सवाल त्यांनी केला. तटकरे पुढे म्हणाले की, आम्ही पालकमंत्रीपदाबाबत मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहोत. काही गोष्टी या गणिमी काव्याच्या असतात. त्या आम्ही त्यांना सांगणार आहोत, असं गोगावले यांनी स्पष्ट केलं.
महेंद्र दळवींचाही निशाणा
याच वेळी आ. महेंद्र दळवी यांनीही तटकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, खरंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही आदिती तटकरे या पालकमंत्री होत्या. त्यांच्या कार्यपद्धतील कंटाळूनच आम्ही शिवसेनेत उठाव केला होता. रायगड जिल्ह्यातील आम्ही तीन आमदार गुहाहटीला सर्वात पुढे होतो. त्यानंतर गुवाहटी चर्चेत आले. आम्ही सत्ता बदलली. सत्ता बदलानंतर आम्हाला उदय सामंत हे पालकमंत्री मिळाले. मात्र आता पु्न्हा तटकरे हेच पालकमंत्री देणार असाल, तर ते आम्हाला मान्य नाही.
तटकरेंकडे जादू
दळवी म्हणाले, पहिल्यांदा महाविकास आघाडीची सत्ता आली तरी, सुनील तटकरे यांनी मुलीला पालकमंत्री केलं. आता महायुतीची सत्ता आली तरी त्यांनी आपल्या मुलीलाच पालकमंत्री केलं. तटकरेंकडे काय जादू आहे, माहीत नाही. आम्ही पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावलेंचं नाव फायनल केलं होतं. सगळं ठरलं होतं, मात्र रात्रीत ते नाव बदललं. तटकरेंनी पुन्हा त्यांची जादू दाखवली. मात्र आता आम्हाली ती जादूच मान्य नाही, असा टोला दळवी यांनी लगावला.












Click it and Unblock the Notifications