संतोष देशमुख हत्याकांड; 14 महिन्यांनंतर हा आरोपी येणार जेलबाहेर; कोर्टाची 'परवानगी' पण या आहेत अटी?
Beed crime Santosh Deshmukh case Update : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बीडमधील बहुचर्चित सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी जयराम चाटे तब्बल १४ महिन्यांच्या कारावासानंतर पहिल्यांदाच जेलबाहेर येणार आहे. विशेष न्यायालयाने त्याला काही तासांसाठी ही परवानगी दिली असून, या निर्णयामुळे पीडित कुटुंबासह राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.

नेमकं कारण काय? का मिळाली परवानगी?
मिळालेल्या माहितीनुसार, जयराम चाटे याचा धाकटा भाऊ श्रीराम चाटे याचे 2 मार्च रोजी तांबवा (ता. धारूर) येथे निधन झाले. हिंदू धर्मशास्त्रातील परंपरेनुसार, निधनानंतरचा 12 व्या दिवशी होणारा धार्मिक विधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आपल्या सख्ख्या भावाच्या या अंतिम धार्मिक विधीला उपस्थित राहता यावे, या मानवतावादी भूमिकेतून जयराम चाटेच्या वकिलांनी न्यायालयात विशेष रजेचा अर्ज दाखल केला होता.
न्यायालयाची सुनावणी आणि सरकारी पक्षाचा विरोध
६ मार्च रोजी जिल्हा व विशेष न्यायालयात या अर्जावर खडाजंगी झाली.
सरकारी पक्षाचा युक्तिवाद: सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी या अर्जाला तीव्र विरोध दर्शवला. प्रकरणाचे गांभीर्य आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असे मुद्दे त्यांनी मांडले.
न्यायालयाचा निर्णय : दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने आरोपीला केवळ धार्मिक विधीसाठी मर्यादित काळासाठी बाहेर येण्याची परवानगी दिली.
कोर्टाचे आदेश : जयराम चाटेला सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेतच बाहेर राहता येईल. या कालावधीत तो पूर्णपणे पोलीस बंदोबस्तात असेल.
कडक अटी आणि 'खर्च' आरोपीचाच!
न्यायालयाने केवळ परवानगी दिली नाही, तर त्यावर काही कडक ताशेरे आणि अटीही लादल्या आहेत. आरोपीला संरक्षण देण्यासाठी तैनात केल्या जाणाऱ्या पोलीस पथकाचा सर्व खर्च जयराम चाटेला स्वतःला करावा लागणार आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत त्याला पुन्हा कारागृहात हजर व्हावे लागेल. या काळात कोणतीही प्रक्षोभक कृती किंवा नियमांचे उल्लंघन झाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल.
धनंजय देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया: "जबाबदारी कोण घेणार?"
मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, "हे प्रकरण केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्र गेल्या सव्वा वर्षांपासून या आरोपींची वृत्ती बघतोय. हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. जर या धार्मिक विधीच्या वेळी गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी प्रशासन घेणार का?" विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही यापूर्वी सुरक्षेचा आणि तणावाचा मुद्दा अधोरेखित केला होता, अशी आठवणही देशमुख यांनी यावेळी करून दिली.
तांबवा गावात पोलीस छावणीचे स्वरूप?
आरोपी जयराम चाटे तांबवा गावात येणार असल्याने पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दोन्ही गटात मोठा तणाव निर्माण झाला होता. आता १४ महिन्यांनंतर आरोपी गावात येत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.












Click it and Unblock the Notifications