दिव्यांगांचा भाऊ, बच्चूभाऊ ! न्याय मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलने, विधिमंडळातही उठवला आवाज
Bachu Kadu savior of disabled : राजकारण म्हणजे सत्ताकारण, राजकारणाच्या माध्यमातून सत्तेपर्यंत पोहोचायचे आणि सत्तेचे लाभ आपल्या संस्थांसाठी करून घ्यायचा, असाच बहुतेक राजकारण्यांचा मनसुबा असतो. गोर-गरिबांसाठी लढणे, त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करणे प्रसंगी प्रशासनाशी आणि सरकारशीही संघर्ष करणे, अशा बाबी राजकारणात दुय्यम ठरत जातात. पण शेतकरी, वंचित, महिला आणि दिव्यांग यांच्यासाठी आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द पणाला लावणारा महाराष्ट्रातील एकमेव राजकीय नेता म्हणजे धुरंधर नेते तथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू.
शेतकरी, महिला आणि सामान्य वर्गासाठी बच्चू कडू यांनी केलेली आंदोलने आणि पुकारलेला संघर्ष महाराष्ट्रात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय आहे. बच्चू कडूंची आंदोलने परिणाम घडवून आणणारी असतात. विशेषतः दिव्यांग बांधवांसाठी बच्चू कडू यांनी उभारलेले काम आभाळाएवढे आहे. त्यांच्या या कामामुळेच त्यांना "दिव्यांगांचा तारणहार" असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

बच्चू कडूंना "दिव्यांगांचे मसीहा" म्हणून ओळखले जाते. अपंग बांधवांसाठीच्या सरकारच्या योजनांची अमलबजावणी व्हावी, यासाठी त्यांनी वेळोवेळी विधीमंडळात आवाज उठवला. आंदोलने केली. आपली प्रहार संघटना दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभी केली.म्हणूनच देशभरातील दिव्यांग बांधवांनी आपले नेतृत्व निर्विवाद बच्चूभाऊ यांच्याकडे दिले.
दिव्यांग बांधवांसाठी बच्चू कडू यांचा संघर्ष 15 वर्षांपूर्वी सुरू झाला. पुण्यात काही दिव्यांग बांधवांची आणि बच्चू कडू यांची भेट झाली. दिव्यांगांच्या व्यथा त्यांना त्यावेळी नव्याने कळल्या. सरकारदरबारी होत असलेली दिव्यांगांची ससेहोलपट, नियमांची होत नसलेली अंमलबजावणी आणि दिव्यांग बांधवांचे त्यामुळे होणारे हाल ऐकून बच्चू कडू यांचे हृदय विदीर्ण झाले आणि तेथूनच सुरू झाला एक प्रचंड मोठा लढा..
बच्चू कडू यांनी दिव्यांग बांधवांसाठी सुरु केलेले "देहू ते वर्षा" आंदोलन हे दिव्यांग बांधवांच्या लढ्याची ठिणगी ठरली आणि बघता बघता या ठिणगीचे वणव्यात रूपांतर झाले. राज्यभरातील दिव्यांग बांधव "प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या" झेंड्याखाली एकवटले. दिव्यांग बांधवांनी प्रहार संघटनेला नेतृत्व दिले. पंतप्रधान कार्यालयासमोर आंदोलन, महाराष्ट्र सदन ताब्यात घेणे, सामाजिक न्यायमंत्र्यांच्या घराचा ताबा, आझाद मैदानावर डेरा अशी अनेक आंदोलने बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. बच्चू कडू यांचा आवाज देशभरात घुमला आणि एक एका उपाय योजनेची अंमलबजावणी सरकारदरबारी सुरू झाली.
बच्चू कडूंनी विधीमंडळात उठवला आवाज
दिव्यांगांसाठी बच्चू कडू यांनी रस्त्यावर लढा दिला. विधिमंडळात आवाज उठवला. प्रसंगी प्रशासनाशीही पंगा घेतला. दिव्यांग बांधवांच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचे धाडस देखील बच्चू कडू यांनीच दाखवले. यानंतर प्रशासन त्यांच्या विरोधात एकवटले, पण बच्चू कडू नमले नाहीत. अधिकाऱ्यांना मारहाण केल्याबद्दल बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्यांना अटक झाली. पण दिव्यांग बांधवांसाठी घेतलेलेल्या आपल्या भूमिकेपासून डगमगले नाहीत.
महाराष्ट्रात गुन्हे दाखल असलेले अनेक राजकारणी आहेत. पण दिव्यांग बांधवांसाठी केलेल्या आंदोलनासाठी त्यांच्या भल्यासाठी गुन्हा दाखल झालेला आणि अटक झालेला कुणी नेता किंवा आमदार असेल तर एकमेव नाव म्हणजे बच्चू कडू.
दिव्यांगासाठी झटणारा नेता म्हणून देशात नाव
दहा-बारा वर्षांपूर्वी बच्चू कडू यांनी आंदोलनाची ठिणगी पेटवली आणि बघता बघता त्याचे वणव्यात रूपांतर झाले. दिव्यांगांसाठी झटणारा नेता म्हणून बच्चू कडू यांचे नाव देशभर पोहोचले. केंद्र सरकारलाही बच्चू कडू यांच्या मागण्यांची दखल अखेरीस घ्यावी लागली. 1995 साली अपंग पुनर्वसन कायदा झाला होता, मात्र त्याची अंमलबजावणी कागदोपत्रीच होती. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी बच्चू कडू यांचा लढा होता. त्यांचा लढा आणि आंदोलन यामुळे दिव्यांग बांधवांना मिळणारे प्रतिमहा मदत सहाशे रुपये वरून एक हजार रुपये करण्यात आली. दिव्यांग बांधवांसाठीचा निधी तीन टक्के वरून पाच टक्के करण्यात आला.

बच्चू कडूंच्या लढ्यामुळेच दिव्यांगांना स्थानिक स्वराज्य संस्थांत आरक्षण
ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिका येथे दिव्यांग बांधवांसाठी तीन टक्के गाळेवाटप करण्यात येऊ लागले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांग बांधवांना तीन टक्के आरक्षण मिळाले. दिव्यांग पुनर्वसन कायद्याच्या अंमलबजावणीला मिळालेली ही संजीवनीच होती आणि या संजीवनीचे जनक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू होते.
दिव्यांगांच्या मंत्रालयासाठी बच्चू कडूंनी राज्यमंत्रीपद सोडले
दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी फक्त लढ़े आणि आंदोलने उपयोगाची नाहीत, त्यासाठी ठोस असे काहीतरी करायला हवे, हे बच्चू कडू यांनी मनाशी निश्चित केले होते. विविध प्रवर्गांसाठी जशी मंत्रालय असतात तसेच दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय हवे यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बच्चू कडू यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले.
दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. पण ठाकरे यांच्याकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. संतप्त झालेल्या बच्चू कडू यांनी मंत्रीपदावर लाथ मारून एकनाथ शिंदे यांना साथ दिली. दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आणि शिंदे यांनीही ती मान्य केली आणि दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय असलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.

बच्चू कडूंमुळे दिव्यांगांच्या आयुष्यात उज्ज्वल पहाट
दिव्यांग बांधवांची निश्चित अशी गणना आधी होत नव्हती. त्यामुळे त्यांच्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये सुसूत्रता नव्हती. स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना झाल्यामुळे दिव्यांग बांधवांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना सूत्रबद्धता येणार आहे. नव्या योजना आखणे आणि त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करणे अधिक सुलभ ठरणार आहे. दिव्यांग बांधवांनी आतापर्यंत प्रचंड हाल अपेष्टा सोसल्या. पण त्यांच्या उज्वल भविष्याची पहाट उगवली आहे आणि त्याचे श्रेय निश्चितपणे बच्चू कडू यांनाच द्यावे लागणार आहे. बच्चू कडू यांना मिळालेले "दिव्यांगांचा तारणहार" हे बिरुद म्हणूनच सार्थ ठरले आहे.












Click it and Unblock the Notifications