NIA पथक छत्रपती संभाजीनगरात दाखल; एटीएसची मदत घेतल्याचीही चर्चा, नेमकं प्रकरण काय आहे?
राज्याच्या राजकारणात सध्या औरंगजेबाची कबर हाच सर्वात जास्त चर्चेत आलेला मुद्दा आहे. या कबरीच्या मुद्यावरुनच नागपूरात हिंसाचार उसळला. अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. यामध्ये पोलिसांसह काही नागरीकही जखमी झाले. दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. या घटनेनंतर राज्यात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मराठवाड्यातील प्रमुख शहरात NIA च्या पथकाने एंट्री केल्याने नेमके काय चालले, हा प्रश्न विचारला जात आहे.

मराठवाड्यातही तणाव?
औरंगजेबाच्या कबरीवरुन नागपूरात हिंसाचार झाला. एका समाजाने दुसऱ्या समाजाला लक्ष केले. अनेक घरांवर दगडफेक झाली. गाड्यांना लक्ष करण्यात आले. आता एनआयए पथकाने मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. मराठवाड्यात तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) दिल्लीचे एक पथक छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले आहे. परभणी, जालना, नांदेड या ठिकाणीदेखील पथक गेले असून, तेथील संशयित हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
या जिल्ह्यांवर नजर
राज्यातील ज्या जिल्ह्याला दंगलीची पार्श्वभूमी आहे, त्या जिल्ह्यावर सध्या एनआयए पथकाचे लक्ष आहे. एटीएस अधिकार्यांचीही मदत घेतली जात आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळच्या लेण्या त्याचबरोबर घृष्णेश्वर मंदिर आणि लगतचा असलेला दौलताबाद किल्ला याठिकाणी पर्यटकांची संख्या ही मागील काही दिवसांपासून याच प्रकरणामुळे कमी झाल्याचं चित्र आहे.
नागपूरात संचारबंदी
नागपूरात हिंसाचार घडलेल्या परिमंडळ ३ मधील कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ येथील संचारबंदीचा आजचा पाचवा दिवस आहे. कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत अद्यापंही तणावपूर्ण शांतता आहे. संचारबंदी असलेल्या महाल, भालदारपुरा, हंसापुरी, मोमीनपुरा भागात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी कालपासून ११ पैकी नऊ भागातील संचारबंदी शिथिल केली आहे. इतर भागातील संचारबंदी हटवण्यासाठी आज पोलीस आयुक्त आढावा घेणार आहेत.












Click it and Unblock the Notifications