आशुतोष काळे यांच्या मास्टरस्ट्रोकची कोपरगावमध्ये चर्चा, नेमकं काय घडलं?
कोपरगाव शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रलंबित असलेला रस्ता व कोळ नदीवरील पुलासाठी केंद्रीय रस्ते निधी (CRIF) अंतर्गत तब्बल २७ कोटी रुपयांचा विक्रमी निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. श्री साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशन या अत्यंत दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यासाठी २० कोटी रुपये आणि कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील संवत्सर-भोजडे-धोत्रे रस्ता (प्रजिमा-५) कोळ नदीवरील पुलासाठी सात कोटी असा हा एकूण निधी मंजूर झाला आहे.

प्रलंबित प्रश्न मार्गी; काळेंच्या कामाचे कौतुक
कोपरगाव-वैजापूर राज्य महामार्गावरील श्री साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशन हा रस्ता शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी, रेल्वे प्रवाशी आणि शिंगणापूर, वैजापूरकडे जाणारे प्रवासी नियमितपणे या रस्त्याचा वापर करतात. रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. तसेच, धोत्रे-भोजडे गावाला जोडणारा कोळ नदीवरील पूल पाच दशकांपूर्वीचा असून तो वाहून गेल्यामुळे पावसाळ्यात अनेक गावातील नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे हाल होत होते.
या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या आणि प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या निधीमुळे लाखो नागरिकांची मोठी सोय होणार आहे. प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्यामुळे आमदार आशुतोष काळे यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
नगरपालिका निवडणूक 'विकासाच्या' मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न!
सध्या कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकांचे वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर, आमदार आशुतोष काळे यांनी केंद्रातून २७ कोटींचा एवढा मोठा निधी मंजूर करून आणणे, हा एक राजकीय 'मास्टरस्ट्रोक' मानला जात आहे.
राजकीय वर्तुळात सध्या वैयक्तिक हेवेदावे आणि आरोप-प्रत्यारोपांची रणधुमाळी सुरू आहे. या नकारात्मक वातावरणावरून नागरिकांचे लक्ष हटवून आमदार काळेंनी हा निधी मंजूर करून ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आणली असल्याचे मत मांडले जात आहे.
ऐन नगरपालिका निवडणूक काळात एवढा मोठा निधी मंजूर करून आणल्याने राजकीय विश्लेषकांकडून त्यांचे पारडे सध्या जड असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. कोपरगावच्या विकासासाठी काळे यांचा राज्य व केंद्र शासनाकडे असलेला पाठपुरावा, या निधीमुळे सिद्ध झाला असून, यामुळे मतदारांमध्ये एक सकारात्मक संदेश गेला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
यापूर्वी आमदार काळेंनी सावळीविहीर-कोपरगाव या राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यातून १९१ कोटी निधी आणून रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे नेले आहे. आता मंजूर झालेल्या २७ कोटींच्या निधीमुळे कोपरगावच्या पूर्व-पश्चिम भागासह दोन्ही तालुके (कोपरगाव-वैजापूर) एकमेकांना जोडले जाणार आहेत.
या निधीबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने आभार मानले आहेत.












Click it and Unblock the Notifications