सांगलीतील आष्टा न.प. निवडणुकीत राडा; स्ट्राँगरुमबाहेर अलोट गर्दी; मतदान आकडेवारीत 3 हजारांचा फरक!
Ashta Election Row : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलले गेल्याने, ईव्हीएम (EVM) मतदान पेट्या सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासन आणि पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
त्यातच, सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषदेच्या ईव्हीएम स्ट्राँगरुमबाहेर बुधवारी मोठ्या संख्येने नागरिकांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी गर्दी करत गोंधळ घातला. काल झालेल्या मतदानाचे आकडे आणि प्रशासनाने जाहीर केलेले आकडे यात मोठी तफावत असल्याचा गंभीर आरोप मतदार आणि विरोधी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

आकडेवारीतील तफावत अन् नागरिकांचा संताप!
आष्टा नगरपरिषदेतील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉलसमोर आष्टा शहर विकास आघाडीचे पदाधिकारी आणि बहुसंख्य नागरिक जमले होते. त्यांच्या आक्षेपाचे मुख्य कारण प्रशासनाने जाहीर केलेल्या मतदानाच्या आकडेवारीतील मोठी विसंगती हे आहे.
प्रशासनाने रात्री उशिरा दिलेल्या आकडेवारीमध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत जवळपास दोन हजार मतांची वाढ असल्याचा आरोप आष्टा शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
मतदारांची संख्या
आष्टा नगरपरिषदेसाठी शहरात एकूण मतदारसंख्या ३०,५७४ एवढी आहे. प्रत्यक्ष झालेले मतदान २२,८६४ एवढे आहे. पोर्टलवर जाहीर केलेल्या मतदार यादीत एकूण मतसंख्या ३३,३२८ दाखवली आहे. तसेच, झालेल्या मतदानाची आकडेवारी २४,९१३ दाखवली आहे, तर प्रत्यक्ष मतदान २२,८६४ इतकेच झाले आहे. म्हणजेच, जाहीर केलेल्या मतदानाच्या आकडेवारीत तब्बल २९०० मतांचा फरक असल्याचा गंभीर आरोप वैभव शिंदे यांनी केला.
प्रभागनिहाय त्रुटी
एका प्रभागात १३११ मतदार असताना पोर्टलवर ४०७७ मतदारसंख्या दाखवली आहे, तर प्रभाग ६ मध्ये ३०५६ मतदारांपैकी २३९४ मतदान झाले असताना पोर्टलवर १७९५ दाखवले आहे. अशा अनेक तांत्रिक त्रुटी आढळल्यामुळे संशय बळावला आहे. आष्टा शहर विकास आघाडीचे उमेदवार वैभव शिंदे यांनी तातडीने स्ट्राँग रुमबाहेर जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.
निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण!
उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी माध्यमांशी बोलताना या गोंधळावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, पत्रकारांच्या ग्रुपवरील आकडेवारी आणि एकूण मतदानाची खरी आकडेवारी यात थोडी तफावत होती, त्यावरून हा विषय निघाला. मात्र, आम्ही जिल्हा निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला जी आकडेवारी कळवली आहे, ती नमुना व्हीएम ३ नुसारच कळवली आहे आणि त्यामध्ये कोणताही बदल नाही." ते पुढे म्हणाले की, हा केवळ संभ्रम झालेला असून तो दूर करण्यासाठीच आपण येथे आलो आहोत.
'जॅमर बसवा' आणि 'आष्टा बंद'चा इशारा!
नगराध्यक्षपदासाठी आष्टा शहर विकास आघाडीकडून विशाल शिंदे हे उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि महायुतीकडून प्रवीण माने हे उमेदवार आहेत. या गोंधळात स्ट्राँगरुमसमोर केवळ विरोधी आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी काही मागण्या करण्यात आल्या. स्ट्राँगरुमबाहेर २४ तास सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असावेत. प्रत्येक उमेदवाराचा प्रतिनिधी स्ट्राँगरुमबाहेर उपस्थित असावा. स्ट्राँगरुमच्या परिसरात जॅमर बसवावा, जेणेकरून कोणत्याही प्रकारे ईव्हीएम मशीनशी छेडछाड होणार नाही.












Click it and Unblock the Notifications