आदित्य ठाकरे फिरत नाहीत अन् प्रियंका चतुर्वेदींचा उपयोग काय?" ठाकरे गटाच्या बैठकीत खासदारांचा संताप
शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत कमालीचा तणाव पाहायला मिळाला. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या चर्चेत खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट पक्षप्रमुखांसमोरच आपली नाराजी व्यक्त केली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

बैठकीची सुरुवात करताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांवर पूर्ण विश्वास दर्शवला. भाजप आणि राष्ट्रवादीकडून तुमचे खासदार फुटतील, अशा चर्चा पसरवल्या जात असल्या तरी, आपण ही सर्व लढाई सहकाऱ्यांच्या भरवशावरच लढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच दरम्यान राज्यसभेच्या जागेवरून काँग्रेस नेत्यांशी झालेल्या चर्चेचा तपशील ठाकरे सांगत होते. विरोधकांच्या संयुक्त रणनीतीसाठी ही जागा काँग्रेसला देण्याची मागणी दिल्लीतून झाली होती. यावर भाष्य करताना ठाकरेंनी शिवसेना आणि राष्ट्रवादीतील संभाव्य वाद टाळण्यासाठी घेतलेल्या भूमिकेची माहिती दिली.
मात्र, उद्धव ठाकरे आपले म्हणणे मांडत असतानाच प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांना अडवून तीव्र आक्षेप घेतला. "I want to protest" (मला निषेध नोंदवायचा आहे) असे म्हणत त्यांनी थेट संजय राऊत यांच्या विधानावर बोट ठेवले. संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या संदर्भात केलेल्या विधानाची काय गरज होती, असा रोखठोक सवाल चतुर्वेदी यांनी उपस्थित केला. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे बैठकीत शांतता पसरली. यावर उद्धव ठाकरेंनी राऊत यांची पाठराखण करत स्पष्ट केले की, जरी ते बोलले असले तरी अंतिम निर्णय हा पक्षप्रमुख म्हणून आपलाच असेल.
या अंतर्गत वादानंतर बैठकीत आणखी एक नाट्यमय वळण आले. मराठवाड्यातील एका खासदाराने प्रियंका चतुर्वेदी यांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांना सहा वर्षे संधी देऊन पक्षाला नेमका काय फायदा झाला, अशी विचारणा या खासदाराने ठाकरेंकडे केली. याचसोबत, आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रात फारसे फिरत नसल्याची तक्रारही काही खासदारांनी यावेळी बोलून दाखवली. या तक्रारींमुळे आदित्य ठाकरे नाराज दिसले आणि त्यांनी बैठकीनंतर इतर खासदारांशी फारसा संवाद साधला नाही. एकूणच, ही बैठक समन्वयाऐवजी पक्षांतर्गत मतभेद आणि नाराजी चव्हाट्यावर आणणारी ठरली.












Click it and Unblock the Notifications