विधान परिषदेत गरमागरमी! अनिल परबांनी गोऱ्हेंना लक्षात आणून दिली चूक
मुंबई: राज्याचं अधिवेशन सध्या सुरु आहे. अगदी पहिल्या दिवसांपासून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विरोधकांमध्ये किरकोळ वाद सुरु आहेत. त्यामुळे रोजच गरमा-गरमी होताना दिसत आहे.
आज विधान परिषदेत ठाकरे गटाचे नवनिर्चित आमदार अनिल परब आणि नीलम गोऱ्हे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अनिल परब यांनी निलम गोऱ्हे यांची झालेली चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यावर नाराजीही व्यक्त केली. ज्यानंतर नीलम गोऱ्हेंनी मी अनावधानाने बोलून गेले असं स्पष्ट केलं.

नेमकं काय घडलं?
अनिल परब म्हणाले, "उपसभापतींनी आमच्याबाबत आक्षेप नोंदवला आहे. उपसभापती दोन दिवसांपूर्वी म्हणाल्या की, तुम्ही सभागृहात गोंधळ घालता. कारण तुम्हाला उद्धव ठाकरेंना तुम्ही काय काम करता हे दाखवायचं असतं. मग आता मी हे म्हणू का, की तुम्हाला काय आणि किती काम करता हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दाखवायचं असतं म्हणूनच तुम्ही आम्हाला बोलू देत नाही. मी असं म्हटलं, तर तुम्हाला किती राग येईल..?"
पुढे अनिल परब म्हणाले, "मी काम करतो हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. म्हणूनच त्यांनी मला चार वेळा आमदार केलं आहे. हेच तुमच्याबाबत बोललो तर तु्म्हाला राग येईल. माझ्याबाबत तुम्ही जे वक्तव्य केलं ते वक्तव्य सभागृहाच्या कामकाजातून काढून टाका."
निलम गोऱ्हे नेमकं काय म्हणाल्या..
यानंतर नीलम गोऱ्हे यांनी सामोपचाराची भूमिका घेतली. त्या म्हणाल्या, "मी तुमच्याविषयी अनावधानाने काही बोलून गेले असेन. मी तसं काही बोलले आहे का हे तपासून काढून टाकते." असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी अनिल परब यांना ते वक्तव्य काढून टाकण्याचं आश्वासन दिलं आहे. अनिल परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून आले आहेत. त्यांनी भाजपाच्या किरण शेलार यांचा पराभव केला आहे. आज त्यांच्या या वक्तव्यामुळे विधान परिषदेतलं कामकाज चर्चेत राहिलं.












Click it and Unblock the Notifications