अमित शहा महाराष्ट्रात; रायगड पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल का?, आमदार महेंद्र दळवींचा नेमका इशारा काय?
Amit Shaha Maharashtra Tour Update : रायगड व नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा तिढा आज किंवा उद्या सुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदावर दावा केला असून मंत्री भरत गोगावले पालकमंत्री न झाल्यास उठाव करण्याचा इशारा शिंदेंच्या शिवसेनेचे रायगडचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रायगड पालकमंत्रीपदावरुन नेमका वाद काय?
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ जाहीर करण्यात आले. नंतर पालकमंत्रीही जाहीर करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्रिपदी नेमण्यात आले होते.

आदिती तटकरे यांच्याकडून पालकमंत्रीपद का काढले?
शिंदेंच्या शिवसेनेच्या जोरदार विरोधामुळे आदिती तटकरे यांच्याकडून पालकमंत्रीपद हे काढून घेण्यात आले. आदिती तटकरे यांनाच पुन्हा पालकमंत्री करावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोर लावला जात आहे, तर रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले यांनाच पालकमंत्रिपद मिळावे यासाठी शिंदेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे.
आमदार महेंद्र दळवी आक्रमक
भरत गोगावले पालकमंत्री होणार, असा रेटा शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी लावलेला आहे. तर आदिती तटकरे पालकमंत्री व्हाव्यात यासाठी राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद अधिकच चिघळणार, असे दिसून येत आहे.
अमित शहा रायगड दौऱ्यावर दाखल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी ते रायगड किल्ल्यावर दाखल झाले. त्यानंतर मुंबईत त्यांचे कार्यक्रम आहेत. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भोजनाला जाणार आहेत. त्यामुळे अमित शहा यांच्या या दौऱ्यात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद देखील सुटण्याची शक्यता निर्माण झाल्याची चर्चा आहे.
आमदार महेंद्र दळवी काय म्हणाले?
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना सवाल करताना रायगड जिल्ह्याला पालकमंत्री न मिळणं ही शोकांतिका आहे का? असा सवाल केला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना इशारा दिला. 'अमित शहा रायगडला आल्यानंतर रायगड जिल्ह्याला न्याय मिळेल असं वाटतं आणि तो आमच्या बाजूने असेल आमही आशावादी आहोत', असं म्हणत महेंद्र दळवी यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
पुढे ते असेही म्हणाले, भरत गोगावले यांच्या रूपाने रायगड जिल्ह्याला पालकमंत्री मिळेल असं वाटतं. अमित शाह रायगडावर येताय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनाला ते येताय. रायगडला न्याय देतीलच कारण शिवरायांचा मावळा हा भरत गोगावले आहेत. रायगडवर नेहमीच अन्याय झालाय. पण आता रायगडला जाग आली असं म्हणता येईल कारण भरत गोगावले यांच्यारूपाने पालकमंत्री पद घोषित होईल आणि जर भरत गोगावले यांच्याकडे पालकमंत्री पद गेलं नाही तर उठाव नक्की होणार, असा थेट इशारच महेंद्र दळवी यांनी दिला.












Click it and Unblock the Notifications