लाडक्या बहिणींना सुरक्षा पुरवण्यास सरकार अपयशी! अंबादास दानवेंचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल
नवी मुंबई - लाडक्या बहिणींसाठी सरकारने योजनांची घोषणा केली मात्र लाडक्या बहिणींना सुरक्षा पुरवण्यास हे सरकार घोर अपयशी ठरल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
उरण येथील पीडितांच्या कुटुंबियांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेना उपनेत्या व माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, उपनेत्या ज्योतीताई ठाकरे यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले.

पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठाकरेंची शिवसेना
कोपरखैरणे येथील पीडित कुटुंबियांची दानवे यांनी भेट घेतली. या दोन्ही घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करीन, या कठीणप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोबत आहे, अशी ग्वाही दानवे यांनी कुटुंबियांना दिली.
उरण, कोपरखैरणे घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा
नवी मुंबईतील कोपरखैरणे, नेरुळ व उरण भागात महिला व तरुणीसोबत झालेल्या दुर्दैवी घटनांमुळे समाजात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलगती न्यायालयात चालवून कुटुंबियांना न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना भेटून दिले.
उरणचे प्रकरण काय?
यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीचा रायगड जिल्ह्याच्या उरणमध्ये हत्या झाली होती. शुक्रवारी रात्री उरण-पनवेल रेल्वे मार्गालगत तिचा मृतदेह सापडला होता. तिचे अवयव कापून खून करण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. संशयित आरोपी दाऊद शेख हा यशश्रीला खूप वर्षापासून त्रास देत होता आणि म्हणूनच 2019 साली त्याच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल करून घेतला अशी माहितीही समोर येत आहे.
नवी मुंबईतल्या उरण येथे झालेल्या यशश्री शिंदे हत्या प्रकरणात कुटुंबीयांनी आक्रोश व्यक्त करत आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालावा त्याचबरोबर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली.












Click it and Unblock the Notifications