राज्यात दररोज ८ ते ९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या! अंबादास दानवेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल
मुंबई - दुष्काळ, अवकाळी पाऊस,नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या , शेतमालाला बाजारभाव पीक विमा आदी समस्येमुळे शेतकरी त्रस्त आहे.सरकार मोठं मोठ्या घोषणा करत मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काही पडत नाही. राज्य सरकार म्हणतेय की, शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली मग शेतकरी आत्महत्या का करीत आहेत असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
विधान परिषदेत अंबादास दानवे यांनी २६० अनव्ये प्रस्तावावर सरकारला घेरत काही प्रश्नही उपस्थित केले. अंबादास दानवे म्हणाले. सरकारच कृषीधोरण शेतकरीविरोधी आहे. केंद्र व राज्य सरकारच धोरण हे बळीराजाचा बोट मोडणार आहे.

सरकारचे शेतकऱ्यांप्रती पुतना मावशी प्रेम असून सरकारच कृषीविषयक धोरण शेतकरी विरोधी असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी करत शेतकऱ्यांच्या समस्यांवर सरकारवर हल्लाबोल केला.
राज्यात रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या
अंबादास दानवे म्हणाले की, हे सरकार राज्यात आल्यापासून दररोज ८ ते ९ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ८९०० शेतकऱ्यांनी हे सरकार आल्यापासून आत्महत्या केल्या आहेत. मुख्यमंत्री यांनी नांदेड येथे आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याची केलेली घोषणा हवेतच विरल्याचा टोलाही दानवे यांनी लगावला.
पीएम किसानपासून शेतकरी वंचित
अंबादास दानवे म्हणाले, शेतकऱ्यांचे १० हजार २२ कोटी ६४ लाख रुपये शेतपिकांच्या नुकसानीचे तर ५ हजार ९७५ कोटी रुपयांचे कर्ज मुक्त करण्याचे असे एकूण १५ लाख ९९७ कोटी ६४ लाख रुपये सरकारकडे शेतकऱ्यांची थकबाकी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून ५ लाख २८ हजार शेतकरी वंचित आहेत.
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा ४ था हप्ता रुपये १ हजार ८४५ कोटी १७ लाख रुपये केंद्र शासनाच्या १७ व्या हप्त्या सोबत देणे आवश्यक होते मात्र राज्य शासनाने मुद्दाम हा हप्ता रोखून धरला आहे.
नुकसान भरपाई मिळाली नाही
अंबादास दानवे म्हणाले, २०२३ मध्ये राज्यातील १५ जिल्ह्यात २४ तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ तर १६ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला. शासनाने दुष्काळग्रस्त १०२१ महसूल मंडळांमध्ये सवलती जाहीर करूनही अद्याप शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.
जानेवारी २०२४ ते मार्च २०२४ पर्यंतची ४१०५कोटी ७५ लाख रुपयांची नुकसान भरपाईची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या सरकारकडे असलेल्या विविध थकबाकीवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
..म्हणून त्या शेतकऱ्याची आत्महत्या
अंबादास दानवे म्हणाले, शेतकऱ्यांचा कांदा निर्यात धोरण हे दुटप्पी असून गुजरात, मध्यप्रदेश मधून बोगस बी बियाणे, खत हे शेतकऱ्यांच जीवन संपवण्याचं काम करत. राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना जुमानत नाही. संभाजीनगरमधील पिंपळखुटा येथील विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्यांने बँक मॅनेजरने सीबील स्कोअर कमी असल्याचे खोटे कारण देत १ लाख रुपयांची मागणी केल्याने आत्महत्या केली. त्यामुळे बँक मॅनेजरवर कारवाईची मागणी दानवे यांनी सभागृहात केली.
कृषी खात्यात गोण्या खरेदीत अनागोंदी
अंबादास दानवे म्हणाले, ४०० रुपयांची गोणी १२५० रुपयाला विकण्यात आली असून ६ लाख १२ हजार गोण्या खरेदी करण्याचे आदेश यंत्रमाग महामंडळ ला देण्यात आले आहेत. ५२.५३ कोटी रुपयांचे शासनाचे नुकसान झाले असून याप्रकरणी चौकशी करून कारवाईची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.












Click it and Unblock the Notifications