"ठाण्यात पैशाचा धबधबा वाहतोय! सर्व लोक खरेदी केले जात आहेत"-अंबादास दानवेंचा CM शिंदेंवर आरोप
शिवसेना हा पक्ष म्हणून आमची अपेक्षा आहे की 288 जागा लढवाव्या पण आत्ता आम्ही महाविकास आघाडीचे सदस्य आहोत. काँग्रेस आणि आमच्यामध्ये कोणताही वाद नाही, असा खुलासा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. यासह त्यांनी "ठाण्यामध्ये पैशाचा धबधबा वाहतो आहे, सगळे लोक खरेदी केले जात आहेत" असा आरोप त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर मराठवाड्याची जबाबदारी आहे. वन इंडिया मराठी साठी त्यांनी खास मुलाखत दिली.

हरियाणामध्ये भाजपचा विजय झाला आणि काँग्रेसचा पराभव झाला असला तरी महाराष्ट्रात तसं होणार नाही. भाजपबद्दलच बोलायचं असेल तर आपल्याला फक्त हरियाणाबद्दल बोलून चालणार नाही. जम्मू काश्मीरमध्ये भाजपचा पराभव झाला आहे हे तुम्हाला दिसत नाही का? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची चांगली कामगिरी झाली पण ठाणे आणि कोकणात जे नुकसान झालं ते तुम्ही कसं भरून काढणार आहात, त्यावर, ठाणे आणि कोकणातल्या विधानसभा मतदारसंघातही आमची कामगिरी चांगली राहील, असं ते म्हणाले. ठाण्यामध्ये पैशाचा धबधबा वाहतो आहे, सगळे लोक खरेदी केले जात आहेत, असा आरोप त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे, अशीच शिवसेनेचीही भूमिका आहे, असं ते म्हणाले. मी मराठा समाजातून आलेलो असलो तरी मी फक्त मराठा समाजाचा नेता नाही. मी शिवसेनेचा नेता आहे हे सुस्पष्ट आहे, अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी आपली भूमिका मांडली.
लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांच्याऐवजी तुम्हाला उमेदवारी मिळाली असती तर ती जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली असती का? या प्रश्नावर अंबादास दानवे म्हणाले की, माझी संभाजीनगरमधून लढायची इच्छा होती पण ते होऊ शकलं नाही. आता जे झालं ते झालं. तो विषय संपलेला आहे.
तुम्हाला उमेदवारी दिली असती तर जातीच्या गणितांनुसार तुम्ही निवडून आला असतात का या प्रश्नावर मात्र, 'इथे जातीचा मुद्दा नाही तर रणनीतीचा मुद्दा आहे', असं त्यांनी ठासून सांगितलं.
राहुल गांधींच्या हिंदुत्वाच्या वक्तव्यावरून विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे आणि भाजप नेते प्रसाद लाड यांच्यात मोठी खडाजंगी झाली होती. त्यावेळी अश्लील भाषा वापरण्यात आली. या आरोपावरून अंबादास दानवे यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं होतं. तुम्हाला याबद्दल पश्चाताप होतो का ? असा प्रश्नही आम्ही अंबादास दानवे यांना विचारला. त्यावर, 'मी जे बोललो ते बोललो. आम्ही हिंदू म्हणून जगतो', असं ते म्हणाले.
भाजप फक्त हिंदू म्हणून राजकारण करतं पण आम्ही हिंदू म्हणून राजकारण करणार नाही, असं उत्तर त्यांनी दिलं. धर्मवीर सिनेमाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे स्वत:चा प्रचार करतायत ही धर्मवीरांची मोठी फसवणूक आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे कुठे होते तरी का ? असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला. आनंद दिघेंचं काम समजून घेण्यासाठी आम्हाला सिनेमाची गरज नाही, असंही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटण्याआधी आमचे सगळ्यांचे जवळचे संबंध होते पण आता भावना बाजूला ठेवून राजकारण करावं लागतं, असं अंबादास दानवे यांनी सांगितलं. मराठवाड्यामध्ये संजय शिरसाठ यांच्यासारख्या नेत्यांशीही आधी चांगले संबंध होते पण आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे आमच्या चकमकी झडत असतात, असं ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंची शिवसेना आता भाजपसोबत जाणार नाही. तसंच एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना पुन्हा पक्षात घ्यायचा संबंधच नाही, असं ते म्हणाले. मलाही पक्ष सोडण्याच्या ऑफर आल्या. लोकसभा निवडणुकीतही हे चालूच होतं पण मी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी एकनिष्ठ आहे आणि राहीन, अशी ग्वाहीदेखील अंबादास दानवे यांनी या मुलाखतीत दिली.
मराठवाड्यात शेती, नोकऱ्या आणि रोजगार या तिन्ही गोष्टींवर काम करण्याची गरज आहे, असं अंबादास दानवे म्हणाले. शेतीचा प्रश्न सोडवायचा असेल तर सिंचनाचा प्रश्न सोडवायला हवा. शेती सुधारली तर त्यावर आधारित उद्योग येतील आणि तरुणांसाठी संधीही निर्माण होतील, असा दावा त्यांनी केला.
छत्रपती संभाजीनगर प्रमाणेच जालन्यासारख्या भागातही उद्योग उभे राहत आहेत हे त्यांनी लक्षात आणून दिलं. तरीही हिंगोली, बीड यासारख्या जिल्ह्यांमध्ये शिक्षण आणि आरोग्य यावर मूलभूत स्वरूपाचं काम केलं पाहिजे, असे विचार अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.
अंबादास दानवे सुरुवातीला भाजयुमो मध्ये काम करत होते. पण नंतर बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाबद्दलच्या विचारांकडे आकर्षित होऊन मी शिवसेनेत आलो, असं ते म्हणाले. अंबादास दानवे यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. त्याबरोबरच त्यांचं पीएचडीचं कामही सुरू आहे. आधी मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर पीएचडी करत होतो. पण आता राजकारण इतक्या वेगाने बदलतं आहे की आता मी उद्धव ठाकरे यांच्या कामाच्या पद्धतीचा अभ्यास करतो आहे, असं त्यांनी सांगितलं. शिवसेनेमध्ये इतकी बंडं झाली पण या सगळ्याला उद्धव ठाकरे यांनी धैर्याने तोंड दिलं आणि संघटना मजबूत केली, असं ते म्हणाले. आदित्य ठाकरे हेही एक ना एक दिवस राज्याचं नेतृत्व करतील, असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.












Click it and Unblock the Notifications