भुजबळ अधिवेशनाला आले खरे, मात्र अजित दादांवरील प्रश्नावर चांगलेच भडकले; वाचा नेमकं काय झालं...
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन आजपासून शिर्डीत सुरु झाले. या अधिवेशनाला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ येणार की नाही, हा प्रश्न चांगलाच चर्चेत होता. मात्र या अधिवेशनाला हजर राहत, भुजबळ यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या प्रसंगी पत्रकारांनी भुजबळांना पुन्हा नाराजीबद्दल विचारल्यावर मात्र त्यांनी पारा चढवला. अजित पवारांनी अधिवेशनाबाबत भुजबळांना कोणताही संपर्क केलेला नाही, हेही यावेळी स्पष्ट झालं.

जहा नही चैना...
मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्याने छगन भुजबळ हे गेल्या अनेक दिवासांपासून नाराज होते. जहा नही चैना, वहा नही रहना... म्हणत त्यांनी राजकारणात ट्विस्ट आणला होता. ते सुरुवातीला भाजपमध्ये जातील, अशा चर्चा होत्या. त्यानंतर त्यांनी एका कार्यक्रमात शरद पवारांचीही भेट घेतली. त्यानंतर भुजबळ हे पुन्हा शरद पवारांकडे जातील अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र भुजबळांचे तळ्यात-मळ्यात सुरु राहिले. अखेर समता परिषदेच्या माध्यमातून आपण काम सुरु ठेवणार असल्याचे सांगत, छगन भुजबळ आता ओबीसींचाच पक्ष काढतील, अशीही अटकल बांधली गेली.
शिबिराला उपस्थिती
छगन भुजबळ आज शिर्डीत सुरु असलेल्या राष्ट्रवारीच्या शिबिराला उपस्थित राहिले. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, "नाराजी दूर झाली हा मुद्दा येत नाही. हे पक्षाचं शिबीर आहे. कोणाही एका व्यक्तीचं शिबीर नाही. काल प्रफुल्ल पटेल हे मला येऊन भेटले. त्यांनी दोन तास चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही थोडावेळ यायला हवं. सुनील तटकरे यांनीही सांगितलं की तुम्ही थोडावेळ या. मला त्यांनी विनंती केली होती की थोडावेळ तरी या. म्हणून मी आलेलो आहे. याचा अर्थ सर्व काही स्वच्छ झालं असं होत नाही", असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
अजितदादांवर नाराजी कायम
तटकरे व पटेल यांनी भेट घेतल्यावर आपण अधिवेशनाला आलो असल्याचं भुजबळांनी सांगितलं. त्यावर पत्रकारांनी अजित पवारांवर नाराजी कायम आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर भुजबळ भडकले, जाऊ द्या, एकदा नाही म्हणून सांगितलंय ना..? असं म्हणत त्यांनी हा प्रश्न टाळला. अधिवेशनाला आलोय म्हणजे सगळं स्वच्छ झालंय असं नाही... हेही त्यांनी दुसऱ्यांदा स्पष्ट केलं. त्यामुळे भुजबळांचा अजित पवारांवरील राग कायम असल्याचं दिसलं. राज्यसभेवर जाणार का, या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, "राज्यसभेवर जायचं की नाही, असा प्रस्ताव नाही. येवला सोडून मी जाऊ शकत नाही. समता परिषदेचे काम चालू राहिल. माझी तब्येत ठीक नाही. त्यामुळे मी भाषण करणार नाही."












Click it and Unblock the Notifications