शिंदे गटाच्या भाजपवरील नाराजीवर अजित पवारांचे सूचक विधान; म्हणाले-असे दिसते की 2 डिसेंबर रोजी..
Ajit Pawar on Shinde Shivsena and BJp Dispute : सत्ताधारी महायुतीतील भाजप, शिवसेना यांच्यातील धुसफूस मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी चव्हाट्यावर आली, जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेचे बहुतांश मंत्री गैरहजर राहिले. या राजकीय घडामोडींवर महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी नाराजीचे कारण निवडणुकीशी जोडले आहे.

शिवसेनेचे मंत्री गैरहजर राहण्याचे कारण काय?
सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेकडून फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या बहिष्कारामुळे शिवसेनेने आपला मित्रपक्ष असलेल्या भाजपला एक स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये सामील करून घेतले जात आहे, जे शिंदे गटाला मान्य नाही. कल्याण-डोंबिवली परिसरामध्ये अलीकडेच शिवसेनेच्या नेत्यांना भाजपने पक्षात घेतले आहे. यामुळे शिंदे यांच्या पक्षात मोठी अस्वस्थता आणि असंतोष निर्माण झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आहेत, तर एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
अजित पवारांनी सांगितलेले कारण
मुंबईत माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या गैरहजेरीचे कारण वेगळे असल्याचे सांगितले. "असे दिसते की २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांच्या छाननीमुळे शिवसेनेचे मंत्री अनुपस्थित असावेत, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
पवार म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील (मंत्रिमंडळ बैठकीला) अनुपस्थित होते. हसन मुश्रीफ देखील लवकर निघून गेले. जर मला शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीबद्दल माहिती असती, तर मी एकनाथ शिंदे यांना त्याबद्दल विचारले असते. पण मला कोणतीही नाराजी जाणवली नाही."
'प्रत्येक पक्षाला विस्तार करण्याचा अधिकार'
महायुतीतील (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) अंतर्गत कुरबुरीवर बोलताना अजित पवार यांनी सर्व पक्षांना त्यांचा पाठिंबा वाढवण्याचा अधिकार असल्याचे मत मांडले. पवार म्हणाले, "सर्व पक्षांना त्यांचा ठिंबा वाढवण्याचा अधिकार आहे. निवडणुका जवळ आल्यावर हे अधिक घडते." असे म्हणत त्यांनी राजकीय पक्षांमध्ये अशा घटना निवडणुकीच्या तोंडावर सामान्य असल्याचे सूचित केले.












Click it and Unblock the Notifications