पाच महिन्यांत कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार..? अजित पवारांचा बाबा आढावांना थेट सवाल
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात आत्मक्लेश आंदोलनाला बसले आहेत. रोहीत पवार, शरद पवार, छगन भुजबळांसारख्या अनेक राजकीय पदाधिकारी त्यांना भेट दिली. त्यानंतर थेट अजित पवार यांनीही बाबा आढाव यांची भेट घेत, त्यांच्यासमोर आंदोलनाचे सर्व मुद्दे खोडून काढत सडेतोड उत्तरे दिली.

अजितदादांनी केली समोरासमोर चर्चा
आज अजित पवार यांनी आंदोलनकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतली. त्यांच्याशी आंदोलनासंदर्भातील मुद्यांवर चर्चा केली. आढाव यांचे मुद्दे समजून घेतल्यावर अजित पवार म्हणाले, बाबा आढाव यांनी निवडणूक आयोगाशी संबंधित काही मुद्दे मांडले आहेत. त्यांचे काही मुद्दे सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहे. आम्ही निवडणूक आयोगाला काही मुद्दे लक्षात आणून दिले आहेत. निवडणूक आयोगानेही काही मुद्दे मान्य केले होते. मागील लोकसभा निवडणुकीत आमच्या कमी जागा आल्या. त्यावेळी आम्ही किंवा महायुतीतील कुणीही ईव्हीएमबाबत बोललो नाही. विधानसभेत आम्हाला यश मिळाल्यावरच ईव्हीएमचा मुद्दा पुढे आला.
पाच महिन्यांतील बदलावरही बोलले
लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान होते. पण पाच महिन्यांत लगेच कल बदलला. पाच महिन्यांत हा बदल कसा होऊ शकतो, या आढाव यांच्या प्रश्नाचा संदर्भ घेत अजित पवार म्हणाले, बारामतीत काय झाले..? लोकसभेत सुप्रिया सुळेंना मतदान झाले. आता विधानसभेत बारामतीकरांनी मला मतदान दिले. ताईंना लोकसभेला व दादांना विधानसभेला, हे बारामतीकरांचे अगोदरच ठरले होते. माझ्याकडे जसे झाले तसे कदाचित राज्यभर झाले असेल...जनतेचा कौल पाच महिन्यांत कसा बदलला, याचं उत्तर कसं देता येईल..? त्याला आम्ही काहीच काय, कुणीच काहीच करु शकत नाही, असं अजितदादांनी स्पष्ट केलं.
मतदान वाढलं कसं, तेही सांगितलं
राज्यात सायंकाळी पाचनंतर 78 लाख मतदान कसे वाढले..? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, अहो, नाना पटोलेसाहेब संध्याकाळी मतदान वाढत असल्याचे उदाहरण नेहमीची आहेत. पाचनंतर जे रांगेत मतदार उभे असतात त्या सर्वांचे मतदान होते, हा साधा प्रश्न असतो. आता मतदार जर सायंकाळी उशीरा मतदानाला आला तर त्याला आम्ही काय करु शकतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
प्रलोभनावरही दिले उत्तर
बाबा आढाव यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली होती. मतदारांना 1500 रुपये दिले, हे निवडणुकीतील प्रलोभन असल्याचं आढाव यांचं म्हणणं होतं. त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, सरकारी योजना आतापासून नाही. संजय गांधी निराधार योजना अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यावेळी काँग्रेसही मतदारांना पैसे देत होते. आता आम्ही 1500 रुपये देत आहोत. महाविकास आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यात 3000 रुपये देण्याचे आश्वासन दिले. दिल्लीत केजरीवाल यांनीही जनतेला अनेक गोष्टी मोफत दिल्या. बाबा तुम्ही या गोष्टी लक्षात घ्याव्या, अशी अपेक्षाही अजितदादांनी व्यक्त केली.












Click it and Unblock the Notifications