'या' १२ नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू; शपथविधीचे कवित्व संपता संपेना, वाचा नाराजांचे काय चाललेय..?
रविवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील अनेक नेत्यांना मंत्रीपदापासून वंचित रहावे लागले. त्यातील काही नेत्यांनी आपली नाराजी स्पष्ट बोलून दाखवली. काहींनी कालच्या शपथविधीला गैरहजर रहात थेट नागपूरातून आपले घर गाठले. तर काहींनी अधिवेशनाला अनुपस्थिती दर्शवली. येत्या काही दिवसांत ही नाराजी थेट समोर येणार आहे. त्यात विजय शिवतारे, छगन भुजबळ सारख्या नेत्यांनी थेट प्रसारमाध्यमांना आपल्या मनातील खदखद बोलूनही दाखवली.

या 12 नेत्यांना डच्चू
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांना वगळण्यात आले. शपथविधीत सर्वाधिक उलटफेर अजित पवार गटात दिसला. छगन भुजबळ (अजित पवार गट), दिलीप वळसे पाटील (अजित पवार गट), धर्मरावबाबा आत्राम (अजित पवार गट), अनिल भाईदास पाटील (अजित पवार गट) संजय बनसोडे (अजित पवार गट), सुधीर मुनगंटीवार (भाजप), रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे (भाजप), डॉ. विजयकुमार गावित (भाजप) आणि दीपक केसरकर (शिंदे गट), तानाजी सावंत (शिंदे गट), अब्दुल सत्तार (शिंदे गट) या बारा नेत्यांना यावेळच्या मंत्रीमंडळातून डावलण्यात आले आहे.
छगन भुजबळ थेट नाशिकला
मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज झालेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी रेडिसन ब्ल्यू हॉटेलमधे छगन भुजबळ यांची भेट घेतली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. आज विधिमंडळ परिसरात प्रतिक्रिया देताना भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त केलेय. मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, अशी प्रतिक्रिया देत छगन भुजबळ अधिवेशन सोडून तातडीने नाशिकसाठी रवाना झाले.
मुनगंटीवारही झाले नाराज
मंत्रिमंडळातून वगळल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार नाराज झाले. आज विधीमंडळाच्या कामकाजाला ते अनुपस्थित राहिले. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी आपल्याला मंत्रिपदाबद्दल सांगितलं होतं, अस म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी अचानक काय झालं माहित नाही, असा मनातील प्रश्न एका मिडिया हाऊसशी बोलताना व्यक्त केला.
सावंतांनी भरली बॅग
शपथविधी सुरु असताना शिवसेनेचे नेते तानाजी सावंत रविवारी राजभवनाकडे फिरकले देखील नाहीत. सावंत हे नागपूरच्या रेडिसन्स ब्लू हॉटेलमधून बॅग पॅक करुन कालच निघून गेले. सर्व आमदारा नागपुरात असताना तानाजी सावंत माघारी परतले. तब्येत ठीक नसल्याने तानाजी सावंत पुण्याला परतल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली. कोलेस्ट्रॉल वाढल्याने डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला दिल्याचे सांगितले आहे.
शिवतारे थेट संतापले
आम्हाला मिळालेल्या वागणुकीचं वाईट वाटतं. तिन्ही नेते साधे भेटायला तयार नाहीत. मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजी 100 टक्के आहे. आता अडीच वर्षांनी मंत्रीपद दिलं तरी मी घेणार नाही. मला मंत्रिपदाची गरज नाही, असं म्हणत विजय शिवतारेंनी आपली नाराजी थेट प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली.












Click it and Unblock the Notifications