राज ठाकरे-फडणवीस भेटीनंतर काही तासांत ठाकरेंचे तीन नेते 'सागर'वर; नेमका विषय काय?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांस फक्त काही दिवस शिल्लक असताना महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर दुपारी उद्धव ठाकरे गटाचे तीन मोठे नेते थेट सागर बंगल्यावर दाखल झाले. ही चर्चाही बंद दाराआड झाली. या महाराष्ट्रातल्या या दोन्ही भेटींमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

राज-फडणवीस भेट
सकाळी साडेनऊच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट दादर येथील शिवतीर्थावर पोहोचले. तेथे त्यांनी राज ठाकरे यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. फडणवीसांसोबत भाजपचे नेते मोहित कंबोजही उपस्थित होते. शिवतीर्थावर बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांनी फडणवीसांचे स्वागत केले. विशेष म्हणजे या भेटीनंतर ठाकरे व फडणवीस या दोहोंकडून वेगवेगळी उत्तरे देण्यात आली. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही भेट अनौपचारीक असल्याचे सांगितले. तर मनसे नेते योगेश चिले यांनी ही भेट राजकीय नसल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले.
ठाकरेंचे तीन नेते भेटीला
फडणवीसांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर काही वेळातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे आणि सुभाष देसाई फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले. उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जाणारे हे तिन्ही नेते अचानक फडणवीसांच्या भेटीला कशासाठी आले, याबाबत चर्चा सुरु झाल्या. या तिन्ही नेत्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा झाली. फडणवीसांच्या दोन्ही ठाकरेंशी काही तासांतील या भेटी महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवीन संकेत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.
काय असतील शक्यता?
या भेटीनंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही भेट अराजकीय असल्याचे सांगितले. दुसरीकडे हिदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष बदलण्यात येऊ नयेत, यासाठी ही भेट होती असे काहींचे म्हणणे होते. कारण दोन आठवड्यापूर्वी उद्धव ठाकरे यांना या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन काढून टाकण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. सरकारी पातळीवरही या हालचाली सुरु झाल्या होत्या. त्याामुळेच ठाकरे गटाच्या नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली असावी, अशी शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications