समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ७ जणांचा जागीच मृत्यू
जालना: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. दोन कारच्या धडकेत ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील कडवंची गावाजवळ सुमारास हा अपघात झाला.
नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या इर्टिका कारला चुकीच्या बाजूने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की कारमध्ये बसलेले प्रवासी रस्त्याच्या कडेला फेकले गेले.

घटनेची माहिती मिळताच जालना पोलिसांनी घटनास्थळ गाठून क्रेनच्या सहाय्याने दोन्ही गाड्या बाहेर काढल्या. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन्ही कारमधील १०/१२ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ४ प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील ३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
तर एकावर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेतील मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय डॉ. उमेश जाधव यांनी दिली.

मृतांचा आकड्यात वाढ होण्याची भीती
दरम्यान, रात्री उशीरा हा अपघात घडल्यामुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि इतर मदतकार्य घटनास्थळी पोहचायला उशीर झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. तर मृतांच्या आकड्यामध्ये वाढ होऊ शकते अशी भीती वर्तवली जात आहे.












Click it and Unblock the Notifications