गडचिरोलीत 11 माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण; CM देवेंद्र फडणवीसांनी केले पोलिसांचे कौतुक
11 Maoists from Gadchiroli surrendered : गडचिरोलीमध्ये पोलिस अतिशय चांगले काम करत आहेत, या भागातला माओवाद्यांचा प्रभाव आपण संपवला आहे. माओवाद्यांचा प्रभाव संपवून आम्ही गडचिरोली हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा बनविण्यास सुरुवात केली आहे. आता 75 वर्षांनंतर इथल्या लोकांना एसटी बस पाहायला मिळणार आहे, त्यामुळे आजचा दिवस खूप खास असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग व ताडगुडा पुलाचे लोकार्पण तसेच वांगेतुरी-गर्देवाडा-गट्टा-अहेरी बससेवेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी 11 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यांचे स्वागत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
15 गावांत पहिल्यांदाच बससेवा सुरू
गडचिरोली जिल्ह्यातील या मार्गावर जवळपास 15 गावांना पहिल्यांदाच बस सेवा मिळाली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बस सेवेचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी स्वतः एसटीमध्ये बसून गावकऱ्यांसोबत प्रवास केला. माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यातच मुख्यमंत्र्यांनी एसटीचा प्रवास केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गावकऱ्यांनी देखील मुख्यमंत्र्यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला.
गडचिरोली शेवटचा नव्हे पहिला जिल्हा बनला पाहिजे
भारतीय स्वातंत्र्याच्या साडेसात दशकांनंतर पहिल्यांदाच या भागामध्ये बस सेवा सुरू झाली आहे. या माध्यमातून नक्षलवाद संपवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितले. गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नाही तर महाराष्ट्राचा पहिला जिल्हा करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

या भागात चांगले रस्ते आणि पुल विकसित केले गेले, असल्याचा दावा त्यांनी केला. नक्षलवाद्यांना आता स्थानिकांचे सहकार्य मिळत नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. एकच नाही तर अनेक नक्षलवादी आता आत्मसर्पण करत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.
मोठ्या प्रमाणात शरणागती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गडचिरोलीच्या या भागात एक रस्ताही नव्हता आणि इथे माओवाद्यांचे पूर्ण वर्चस्व होते. आज ते वर्चस्व आम्ही संपवत आहोत. येथे 2 मोठ्या चौक्या बांधल्या आहेत. छत्तीसगडला थेट जोडणारा रस्ता आणि पूल बांधला तर 75 वर्षांनंतर इथल्या लोकांना राज्य परिवहन बस बघायला मिळेल हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, आम्ही म्हणालो होतो की गडचिरोली हा महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा राहणार नाही, तो महाराष्ट्रातील पहिला जिल्हा असेल आणि आम्ही ते सुरू केले आहे. आता इथे माओवाद्यांना नवीन लोक भेटत नाहीत. माओवाद्याची भरती बंद असून मोठ्या प्रमाणात शरणागती पत्करत आहेत, त्यामुळे ती संपुष्टात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications