कॉमन मॅन, लाडक्या भावाचा सन्मान, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत काम, शिंदेंच्या प्रेसमधील 10 पॉईंट्स
CM Eknath Shinde Press Conference : महायुती सरकारच्या प्रचंड विजयानंतर शिवसेना नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी प्रथमच पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. कॉमन मॅन, लाडक्या भावाचा सन्मान अन् कार्यकर्ता म्हणून रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत काम ही शिंदेंची पत्रकार परिषदेतील विधान प्रत्येक महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य करणारी ठरली आहे. त्यांच्या प्रेसमध्ये ते नेमकं काय म्हणाले, वाचा 10 पॉईंट्समधून...!
1) मोदी-शहांशी संवाद साधला
सरकार स्थापनेपासून जनतेच्या मिळालेल्या प्रेमापर्यंत सर्व गोष्टींवर त्यांनी मोकळ्यापणाने भूमिका स्पष्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना फोन करुन त्यांच्याशी संवाद साधल्याबाबत देखील त्यांनी स्पष्ट सांगितले. तसेच महायुतीचे सर्व निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

2) रडणारे नाही लढणारे लोक आहोत
एकनाथ शिंदे म्हणाले की, अडीच वर्षांत मी जी कामे केली त्यावर मी समाधानी आहे. आम्ही नाराज होऊन रडणारे नाही. लढणारे लोक आहोत. आम्हाला इतका मोठा विजय मिळाला आहे. हा ऐतिहासिक विजय आहे. कारण आम्ही जीव तोडून मेहनत केली. आम्ही लोकांमध्ये गेलो. घरी बसलो नाही. आम्ही जे केले ते लोकांसाठी केले.
3) काम करणारा कार्यकर्ता
एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, रक्ताच्या शेवटचा थेंब असेपर्यंत मी जनतेसाठी काम करेल. मला काय मिळाले, त्या पेक्षा जनतेला काय मिळाले हा आमचा उद्देश होता. लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांना फायदा झाला हे महत्त्वाचे आहे. त्यांनी मला लाडका भाऊ ही पदवी दिली, तेच महत्वाचे आहे.
4) 'कॉमन मॅन' म्हणून काम केले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी कधी स्वत:ला मुख्यमंत्री समजलो नाही. 'कॉमन मॅन' म्हणून काम केले. मी नेहमी तसाच राहिलो आहे. त्यामुळे मला प्रोटोकॉलचा अडथळा आला नाही. मला नेहमी केंद्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळेच आम्हाला अनेक योजना आणता आल्या.
5) अडीच वर्षात प्रचंड काम केलं
एकनाथ शिंदे म्हणाले की, महिला आणि लाडक्या भावांसाठी आम्ही योजना आणली. शेतकऱ्यांसाठी योजना आणली. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला काही ना काही देण्याचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारने केला. आम्ही अडीच वर्षांत राज्यातील जनतेसाठी प्रचंड काम केले. कल्याणकारी योजना आमच्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या आहेत.
6) राज्याला गती देण्याचे कामं केलं
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत राज्याच्या प्रगतीचा वेग मोठा होता. यापूर्वी महाविकास आघाडीने बंद केलेली कामे आम्ही सुरु केली. आम्ही राज्य एक नंबरला नेण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली. माझ्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह आमच्या सर्व आमदारांनी कामे केली. या सर्वांच्या मेहनतीमुळे राज्य एक नंबरला गेले. महाविकास आघाडीच्या काळात तिसऱ्या क्रमांकावर असलेले राज्य आम्ही सहा महिन्यात नंबर एकवर आणले, असाही दावा त्यांनी केला.
7) नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका काय असेल?
एकनाथ शिंदे म्हणाले, "राज्यात आता महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे आणि माझा त्याला पूर्ण पाठिंबा असेल. भाजपाच्या उमेदवाराला माझं समर्थन असेल. मी महायुतीला पाठिंबा द्यायलाच इथे बसलोय". यावेळी त्यांना विचारण्यात आलं की नव्या मंत्रीमंडाळात तुमचं काय स्थान असेल? तुम्ही आता उपमुख्यमंत्र्यांच्या रुपात दिसणार का? तुम्ही गृहमंत्रीपद मागितल्याची चर्चा आहे. यावर, शिंदे म्हणाले, "उद्या दिल्लीत, आमची तिन्ही पक्षांच्या नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीत या सगळ्यावर चर्चा होईल. त्या चर्चेतून सगळे प्रश्न सुटतील. उपमुख्यमंत्री होणार की आणखी काही ते उद्या ठरेल.
8) महायुतीच्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा
एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात भूमिका जाहीर केली. एकनाथ शिंदे यांनी भाजपचा जो उमेदवार असेल त्या नेत्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या दिल्ली जाणार असल्याचं म्हटलं. एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेसंदर्भात माहिती दिली. अजित पवार यांनी यापूर्वीच भाजपला पाठिंबा दिला आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं भाजपला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
9) एकनाथ शिंदे सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री
288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेत भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या. तर शिवसेनेला 57 व राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. भाजपने या निवडणुकीत आपले 149 उमेदवार दिले होते. तर शिवसेनेने 81 व राष्ट्रवादीने 59 जणांना तिकीट दिले होते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आला आहे. एकनाथ शिंदे यांनीही राजीनामा दिला आहे. आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा राज्यशकट हाकतील.
10) शिंदेंची भूमिका अत्यंत महत्त्वाची- भाजप
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी महायुती म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतली. याद्वारे त्यांनी विरोधी पक्षांच्या ज्या काही तोंडाच्या वाफा सुरू होत्या त्याला पूर्णविराम दिला. शिंदेंनी महाराष्ट्राच्या विकासासाठी खूप काम केले. आम्ही पूर्वीपासूनच त्यांचे काम पाहतो. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना शिंदे यांनी मंत्री म्हणून उत्कृष्ट काम केले. त्यांनी फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण केले.












Click it and Unblock the Notifications