काळजाचा थरकाप उडवणारा रेल्वे अपघात! धावत्या ट्रेनवर क्रेन कोसळली; 22 प्रवाशांचा मृत्यू
Thailand Train Accident : थायलंडमधील नाखोन रत्चासिमा प्रांतात बुधवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी रेल्वे अपघात घडला. हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या बांधकामासाठी वापरली जाणारी एक महाकाय क्रेन चालत्या प्रवासी ट्रेनवर कोसळल्याने हा अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण थायलंडमध्ये शोककळा पसरली असून रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, ही प्रवासी ट्रेन बँकॉकपासून सुमारे २३० किलोमीटर अंतरावर असलेल्या उबोन रत्चाथानी प्रांताकडे जात होती. सिखिओ जिल्ह्यात हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू होते. ट्रेन जात असतानाच अचानक तिथे असलेल्या क्रेनचा तोल गेला आणि ती थेट चालत्या ट्रेनच्या डब्यांवर कोसळली.
हा आघात इतका भीषण होता की, क्रेन कोसळताच ट्रेनचे काही डबे रुळावरून घसरले आणि क्षणार्धात उलटले. धडकेमुळे काही डब्यांनी पेट घेतल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आणि प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली.
मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती
नाखोन रत्चासिमा प्रांतीय पोलीस प्रमुख थाचापोन चिन्नावोंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात २२ निष्पाप जीवांना आपला प्राण गमवावा लागला आहे. ३० हून अधिक जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. जनसंपर्क विभागाने सांगितले की, आतापर्यंत ढिगाऱ्यातून चार मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे, मात्र अनेक प्रवासी अजूनही डब्यांच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि मदत कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आपत्कालीन सेवांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. बचाव पथके गॅस कटरच्या साहाय्याने रेल्वेचे डबे कापून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून सध्या पूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
रेल्वे बांधकामाच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह
या अपघातामुळे थायलंडमधील हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पांच्या कामाच्या पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बँकॉक आणि उबोन रत्चाथानीला जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी मार्गावर काम सुरू असताना रेल्वे वाहतूक सुरू ठेवणे किती सुरक्षित आहे, असा प्रश्न तज्ज्ञांनी विचारला आहे.












Click it and Unblock the Notifications